'त्या' बंद गेटचे तोडले कुलूप.. राजकारण रंगणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात गुरुवारी घडलेल्या एका आगळ्यावेगळ्या घटनेने नवी रंगत येण्याची चिन्हे आहेत. या बाजार समितीचे पुणे रस्त्याच्या दिशेने असलेले व मागील दीड-दोन वर्षांपासून कुलूपबंद असलेल्या मार्केटयार्ड चौकातील दरवाजाचे (गेट) कुलूप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी तोडले व ते गेट सताड उघडे करून टाकले. त्यानंतर बाजार समितीच्या सचिवाने त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना व शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही कळवली आहे. त्यामुळे आता बाजार समितीतील सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार नगर तालुका बाजार समितीच्या पुणे रस्त्याच्या दिशेने असलेल्या दोन दरवाजांपैकी पुणे रस्त्याकडे येणारा दरवाजा कुलूप लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीत डॉ. आंबेडकर चौकातून बाजार समिती आवारात वाहनांना प्रवेश करता येतो, पण बाहेर पडायचे असेल तर पाठीमागील महात्मा फुले मार्केटच्या दिशेने कोठी रस्त्यावरील दरवाजाचा वापर करावा लागतो. बाजार समितीतील काही व्यापारी तसेच व्यावसायिकांच्या व्यवसायावर एक दरवाजा बंद असल्याने परिणाम झाल्याचे सांगितले जात होते व त्यामुळे त्यांच्याकडून हा दरवाजा उघडला जावा, असे त्यांचे म्हणणे होते. पण या दरवाजातून समितीच्या आवारातून बाहेर येणाऱ्या वाहनांमुळे डॉ. आंबेडकर चौकात (मार्केट यार्ड चौक) वाहतूक कोंडी होते, असे वाहतूक सुरक्षा समितीचे म्हणणे होते व ती होऊ नये म्हणून हा दरवाजा बंदच राहावा, असेही त्यांचे सांगणे होते. पण शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्हा प्रशासनास पत्र देऊन हा बंद दरवाजा पुन्हा उघडला जावा, अशी मागणी केली गेली होती. या मागणीची बाजार समिती प्रशासन वा जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर शिवसेनेने या बंद दरवाजाचे कुलूप तोडून तो दरवाजा उघडला, तर दुसरीकडे सेनेच्या या कृतीची माहिती बाजार समिती प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना व शहर वाहतूक पोलिसांना दिली आहे. त्य़ामुळे आता जिल्हा प्रशासन व पोलिस याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जेथे त्रास होईल, तेथे सेना खंबीर असेल
जिथे जिथे व्यापारी व शेतकरी अन्याय आणि अडचणीत असतील तसेच बाजार समितीकडून त्यांना त्रास देण्यात येईल, तिथे शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असा दावा शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. मार्केट यार्ड परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंद प्रवेशव्दार शिवसेनेने उघडले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे,परेश लोखंडे,अमोल येवले,विशाल वालकर,मदन आढाव,संतोष गेनप्पा, मनिष गुगळे, सचिन शिंदे उपस्थित होते. यावेळी सातपुते म्हणाले की, गेल्या कित्येक दिवसापासून बाजार समितीचे एका बाजूने गेट बंद केले होते. या बंद प्रवेशव्दारामुळे व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत होती.अनेक दिवसापासून व्यापारी व शेतकऱ्यांची मागणी होती की बंद केलेले गेट उघडावे. जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही, परंतू यात व्यापाऱ्यांना यश आले नाही. शेवटी शिवसेनेने यात सहभाग घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना सांगून रस्ते सुरक्षा समिती तसेच ज्येष्ठ खासदार सदाशिव लोखंडे यांना सांगितले. त्यांनी मिटींग घेतली. हे गेट तातडीने उघडण्यात यावे असे त्यांनी संबंधितांना आदेश केले. संबंधितांनी आदेशाला केराची टोपली दाखविली म्हणून शिवसैनिकांनी हे कुलुप तोडून गेट उघडलेले आहे. जिथे जिथे व्यापारी शेतकरी अन्याय अडचणी तसेच बाजार समितीकडून त्रास देण्यात येईल, तिथे शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असे ते म्हणाले. यावेळी फुलसौंदर व व्यापाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

समितीने 'त्यांना' कळवले
बाजार समितीचे बंद गेट शिवसेनेने कुलूप तोडून उघडल्याची माहिती बाजार समितीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवली आहे. त्यात म्हटले आहे की, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट क्र १ ची वाहतूक एकेरी करण्याबाबत १९-५-२०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा यांच्या कार्यालयाने (जावक क्रं. ५११, दि. २१-५-२०0१८ रोजीच्या पत्रानुसार) मुख्य गेट नं. १ ची वाहतुक एकेरी करण्याबाबत बाजार समितीस कळवले होते. सदरच्या पत्राची अंमलबजावणी समितीने केली आहे. सदरचे गेट बंद असल्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांची वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याबाबत व वेळोवेळी बाजार समितीने गेट उघडण्याबाबत जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष यांच्याकडे गेट उघडण्याबाबत मागणी केली होती. परंतु आजतागायत प्रशासनाकडून कुठलाही आदेश प्राप्त न झाल्यामुळे सदरचे गेट बंद होते. परंतु आज (दि. ४-२-२०२१) आदोलनकर्ते दिलीप सातपुते व संदेश कार्ले व यांच्यासोबत इतर आदोलन कार्यकर्ते गेटवर आंदोलन व घोषणाबाजी करत सदरचे गेट नं. १ चे कुलूप तोडून टाकून गेट खुले केले आहे. तरी सदरची माहिती जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे सादर केलेली आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. या पत्राची प्रत शहर वाहतूक पोलिसांनाही दिली गेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post