नगरला रंगणार शिवगान स्पर्धा.. शिवजयंतीनिमित्त भाजपचे आयोजन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर पोवाडा, पाळणा, आरती, स्फुर्तीगीते, अभंग, ओवी, ललकारी अशा अनेकविध पद्धतीने शिवगान करण्याची स्पर्धा यंदा शिवजयंतीनिमित्त भाजपतर्फे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ९ फेब्रुवारीला सावेडीत होणार असून, अंतिम फेरी साताऱ्यात होणार आहे. या स्पर्धेत शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठद्वारा शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र स्तरावर भाजप सांस्कृतिक सेलच्या पुढाकाराने ही शिवगान स्पर्धा २०२१" होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर अहमदनगर येथे आद्य वाट्याचार्य भरतमुनी यांच्या जयंतीचे निमित्त साधून ९ फेब्रुवारी रोजी सावेडीतील खंडेलवाल भवनात (जॉगिंग ट्रॅक जवळ,सावेडी, अहमदनगर) होईल तर अंतिम फेरी शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी अजिंक्यतारा गड (सातारा) येथे होणार आहे.

ही शिवगान स्पर्धा केवळ शिवरायांवरील स्तुती गीतांची असून त्यात पोवाडा, पाळणा, आरती, स्फुर्तीगीते, अभंग, ओवी, ललकारी आदी प्रकारचे गीत सादर करता येईल. ही स्पर्धा खुली असून कलाकाराचे वय किमान १२ वर्षे पूर्ण असायला हवे. स्पर्धकांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. प्राथमिक फेरीत वैयक्तिक शिवगान स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे रु. ७०००, ५०००, व ३००० आणि सांघिक प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या संघास अनुक्रमे रु. ११,०००, ७५००, ५१०० रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. या स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी 7276355148, 9028171441 यावर संपर्क करावा.

शिवगान स्पर्धेत नगर जिल्ह्यातील अधिकाधिक गायक कलावंतांनी सहभागी व्हावे, असे महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश सहसंयोजक गीतांजली ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव तसेच खा. डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपा जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हा स्पर्धा संयोजक अमित गटणे यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post