गायनातून उलगडली छत्रपतींची महती.. शिवगान स्पर्धा नगरला उत्साहात


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील स्तुती गीतांसह पोवाडा, पाळणा, आरती, स्फूर्तिगीते, अभंग, ओवी, ललकारी आदी विविध गायन कलांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र प्रभावीपणे शिवगान स्पर्धेतून नगरकरांसमोर मांडले गेले. निमित्त होते- भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने झालेल्या शिवगान गायन स्पर्धेचे. या स्पर्धेतील नगर केंद्रावर विजयी झालेल्या स्पर्धकांना आता अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

यंदाच्या शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र स्तरावर भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या (सेल) वतीने शिवगान स्पर्धा-२०२१चे येथे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर अहमदनगर येथे आद्य नाट्याचार्य भरतमुनी यांच्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारी रोजी सावेडीतील खंडेलवाल भवनात (जॉगिंग ट्रॅक जवळ) झाली. अंतिम फेरी शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारीला अजिंक्यतारा गड-सातारा येथे होणार आहे. नगरला झालेल्या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील गायक कलावंतांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. विवेक दसरे तसेच सुनीता प्रथमशेट्टी यांनी काम पाहिले. या स्पर्धेत वैयक्तिक गटामध्ये प्रथम क्रमांक शर्वरी मुळे यांना सात हजार रोख, द्वितीय क्रमांक आदेश चव्हाण यांना पाच हजार रोख, तृतीय क्रमांक सायली बोकील यांना तीन हजार रोख,उत्तेजनार्थ बक्षीस प्रथम गिरीराज जाधव व द्वितीय नरेंद्र साळवे यांना मिळाले. समूह गट प्रथम क्रमांक स्वरोह्म संगीत विद्यालय यांना 11,000 रोख. द्वितीय राहुरी रॉकर्स (राहुरी) यांना 7500 रोख. तृतीय भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल यांना 5100 रोख, उत्तेजनार्थ प्रथम ओंकार संगीत निकेतन, द्वितीय करंदीकर कलामंच यांनी मिळवले.

भाजप देणार प्रोत्साहन
आगामी काळात कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे काम भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सक्षमपणे करेल, अशी ग्वाही शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते मोहिनीराज गटणे यांनी अंतिम फेरीसाठी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व कलावंतांना ज्येष्ठ अभिनेते पी.डी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तुझं माझं जमतंय फेम अभिनेत्री अवंती होशिंग आणि अभिनेता राहुल सुराणा उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ नगर महानगर कार्यकारिणी सदस्य शिवानी मनवेलीकर यांनी केले. नाट्यशास्त्र प्रणेते आद्य भरतमुनी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली असे सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक विवेक जोशी यांनी सांगितले. जिल्हा स्पर्धा संयोजक अमित गटणे यांनी प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य सौरभ कुलकर्णी यांनी आभार मानले.भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ तर्फे पराग पाठक, प्रदीप वाळके, विद्या जोशी, ऋषिकेश देशमुख, सुरज कुरलीये यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. स्पर्धेत जवळपास नगरमधील शंभर कलावंतांनी सहभाग घेतला. भाजपा संघटन सरचिटणीस अॅड. विवेक नाईक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post