उद्घाटनाआधीच 'तिच्या' नशिबी आंदोलन.. 'बिल्डर्स'चा अनोखा निषेध उपक्रम


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर थोड्या आतल्या बाजूला, पण अवघ्या तीन-चारशे मीटर अंतरावर असलेल्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम अजून सुरू आहे. या कार्यालयाचे उद्घाटनही अजून झालेले नाही. पण जीवनातील पहिले आंदोलन पाहण्याचे या इमारतीच्या नशिबी आले आहे. 

शासकीय विश्रामगृहाच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगर शहरातील बिल्डर्स मंडळी शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) अनोखे निषेध आंदोलन करणार आहेत. स्टील व सिमेंटच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे बांधकामांचा खर्च वाढत चालला असल्याने बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच या दरवाढीचा निषेध आंदोलनातून केला जाणार आहे. पण हे आंदोलन ज्या कार्यालयाचे अजून उदघाटनही झाले नाही व जेथून अजून शासकीय कामकाजही सुरू झालेले नाही, अशा बांधकाम सुरू असलेल्य नव्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याच्या नियोजनातून हे आंदोलन मात्र चर्चेत आले आहे.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अहमदनगर आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अॅण्ड सर्व्हेअर असोसिएशन आणि क्रेडाई संघटनेच्या नगर शाखेवतीने सिमेंट व स्टील दरवाढीविरोधात शुक्रवारी देशव्यापी धरणे आंदोलन व लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. १२ रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहामागील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे संस्थापक-अध्यक्ष जवाहर मुथा यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून स्टील व सिमेंटच्या दरामध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. सिमेंट जवळपास २५ % तर स्टील ५० % महाग झाले आहे. नगरमध्ये काम करणाऱ्या आर्किटेक्स्, इंजिनिअर्स अॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन, क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अहमदनगर सेंटरवतीने या दरवाढीचा निषेध करत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी हे आंदोलन होणार आहे.

तीनही संघटनांचे नगरमध्ये २ हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्स, बिल्डर्स बांधकाम व्यवसाय करीत असून सातत्याने होणाऱ्या दरवाढीने हा व्यवसाय धोक्यात आला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या दरवाढीला आळा घालण्यासाठी व संस्थेच्या मागण्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना दर कमी झाल्यावर बांधकाम करणे शक्य होण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्याचे नियोजन आहे. धरणे आंदोलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस अन्वर शेख, प्रदीप तांदळे, अनिल कोठारी, जवाहर मुथा, अध्यक्ष मच्छिंद्र पागिरे, मनोज गुंदेचा, विजयकुमार पादिर आदी तिन्ही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post