अहमदनगरमधील वाहतूक कोंडीला मनपा जबाबदार; वाहतूक पोलिसही झाले हतबल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर शहरांतर्गत रस्त्यांची दुरवस्था व महामार्गालगतची नागरी सुविधांची कामे करताना त्यात होणारी संथगती यामुळे नगरमधून जाणाऱ्या महामार्गांवर तसेच शहरांतर्गत दिल्लीगेट, नवीपेठ, चितळे रस्ता व अन्य भागातही वाहतूक जाम होऊन वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार मागील आठवड्यापासून वाढले आहे. वाहतूक पोलिसांकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले जाते, पण शहरांतर्गत वाहतूक कोंडी मात्र सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. यामुळे वाहतूक पोलिसही हतबल झाले आहेत. दरम्यान, शहरातील वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ खुद्द पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यावरच आल्याने त्यांनी वाहतूक कोंडीची ही समस्या दूर करण्याचे काम गांभीर्याने मनावर घेतले आहे. मनपाच्या संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांसमोर आणून त्यांच्याकडून वाहतूक कोंडीवरील मनपास्तरावरील आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन त्यांनी सुरू केले आहे.

नगर शहरातून पुणे, दौंड, सोलापूर, जामखेड, पाथर्डी, औरंगाबाद, मनमाड व कल्याण असे ८ राज्य व राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे या महामार्गांवर अवजड व लहान वाहनांची नेहमी गर्दी असते. तशात जीपीओ चौकापासून चांदणी चौकापर्यंत उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने त्या भागात दोन्ही बाजूंचे रस्ते लहान झाले आहेत. यामुळे महामार्गांवर वाहनांची रांगच रांग दिवसभर असते. अशा स्थितीत स्थानिक शहरांतर्गत छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक महामार्गांवर आल्यास वाहतूक कोंडीत भरच पडते. काही दिवसांपूर्वी मार्केट यार्ड चौकात असलेला व मार्केट यार्डमधून बाहेर पडण्यासाठी असलेला बंद दरवाजा खुला केला गेल्याने आता मार्केट यार्डमधील वाहतूकही याच मार्गाने नगर-पुणे महामार्गावर येत असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडू लागली आहे. महामार्गांची अशी स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे दिल्लीगेट, चितळे रोड, नवी पेठ, दिल्लीगेट ते जुनी महापालिका अशा अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी सुरू आहे. नेप्ती चौकाकडून नीलक्रांती चौकाकडे येण्यासाठी साताळकर हॉस्पिटल मार्गे एकेरी वाहतुकीचा रस्ता मनपाने दुरुस्ती कामामुळे बंद केला आहे. त्यामुळे आता नेप्ती चौकाकडून येणारी वाहतूक दिल्लीगेट मार्गे नीलक्रांती चौकाकडे जाते. याच रस्त्यावर दिल्लीगेट ते नीलक्रांती चौकादरम्यान रस्त्यातील खड्डे दुरुस्तीसाठी मनपाने खडी टाकल्याने त्यावरून वाहने नेणेही वाहनचालकांना कसरतीचे होत आहे व ही खडी चुकवण्यासाठी बहुतांश वाहने रस्त्याच्या मधोमध जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. वाहतूक पोलिसांच्यादृष्टीने महामार्गावरील व शहरांतर्गत वाहतूक कोंडीची समस्या वैतागाची झाली आहे.

पोलिसांनी काढले काही निष्कर्ष
शहरांतर्गत बहुतांश रस्ते नादुरुस्त आहेत. भूमिगत ड्रेनेज योजना, अमृत पाणी योजना व केबल नेटवर्कसाठी खोदून ठेवलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. परिणामी, या रस्त्यांवरील खड्डे चुकवण्यासाठी वाहनांना संथ गतीने जावे लागते. परिणामी, अपेक्षित वेगाने वाहतूक पुढे सरकत नाही व दोन वाहनांच्या मधल्या मोकळ्या जागांमध्ये दुचाकी, रिक्षा वा अन्य छोटी वाहने घुसली तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरांतर्गत रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने मार्गी लागण्यासह शहरांतर्गत रस्त्यांवरील दुकानांचे फलक, टपऱ्या वा अन्य अतिक्रमणेही वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असल्याने ती तातडीने हटवण्यासाठी मनपाने पुढाकार घेण्याची गरज आहे. महामार्गावरील जीपीओ चौकात पाईपलाइन टाकण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडीही यामुळे होत असल्याचे पोलिसांचे निष्कर्ष आहेत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी दूर होण्याच्यादृष्टीने अतिक्रमणे हटवणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य अनुषंगिक कामे करण्यास भाग पाडण्याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे.

काही उपाययोजनांवरही विचार सुरू
मनमाड व औरंगाबाद रस्त्याने येणारी आणि जामखेड वा सोलापूरकडे जाणारी अवजड वाहने पोलिस अधीक्षक चौकातून सरळ भिंगारच्या दिशेने नेऊन भुईकोट किल्ल्याजवळच्या रस्त्याने सोलापूर रस्त्याला नेण्याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे ही वाहने जीपीओ व चांदणी चौकाकडे जाणे टाळले जाणार असून, उड्डाण पुलाच्या काम सुरू असल्याने येथे होणारी वाहनांची गर्दी काहीअंशी कमी होणार आहे. याचबरोबर नीलक्रांती चौक ते नेप्ती नाका रस्त्यावरील दोन्ही बाजूंची अतिक्रमणे तातडीने हटवण्यासाठी मनपाकडे पाठपुरावाही सुरू केला जाणार आहे. अर्थात मनपा प्रशासन त्याला कितपत प्रतिसाद देते, यावर शहरांतर्गत वाहतूक कोंडी दूर होते की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post