एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
मी स्वतः शालेय अभ्यासात सामान्य गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. तरी देखील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवू शकलो. प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती अंगीकारल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी विशेषत: ग्रामीण भागातील मुलांनी कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनोज पाटील यांची जाहीर मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
कॉप्युटर इंजिनियर असणारे पाटील यांनी दोन वर्ष अध्यापक म्हणून काम केले आहे. आपल्याला घडवण्यामध्ये आपल्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचे तसेच सेवेतील वरिष्ठ तसेच कनिष्ठ सहकाऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले. आपल्या कार्यकाळात नगरमध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांची कामे ठराविक कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी ई-टपाल सेवा सुरू करण्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला पेपरलेस करण्यासाठी आणि समाजातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वसामान्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. नगर शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ट्रॅफिक इंजिनीअरिंगचा उपयोग करण्याचा मनोदय असल्याचे सांगितले. विशेषत: कापड बाजार परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल. पोलिस, नागरिक यांना एकत्रित मिळून वाहतूक समस्येवर काम करावे लागेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे यांनी केले. भूमिका प्रशांत जाधव यांनी विशद केली. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी मनोगते व्यक्त केली. सुजित जगताप, किरण वाडेकर यांनी आभार मानले. योगेश जस्वाल, सचिन वारुळे,धुळाजी महारनवर, शामल पवार आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
Post a Comment