'त्या' हॉस्पिटल्समधील मेडिकल दुकाने रडारवर; 'जीएसटी' चौकशीची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना काळात रुग्णांना अव्वाच्या सव्वा वैद्यकीय बिले आकारून त्यांची लूटमार करणाऱ्या नगर शहरातील १४-१५ रुग्णालयांतील मेडिकल दुकाने (औषधालये) आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. या दुकानांद्वारे खरेदी केलेल्या विविध औषधांवर आकारल्या गेलेल्या जीएसटीची तपासणी होण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या तपासणीमुळे संबंधित खासगी रुग्णालयांनी कोविड काळात रुग्णांना दिलेली औषधे तेवढ्या प्रमाणात त्याच रुग्णालयाच्या आवारात असलेल्या औषधालयाने खरेदी केली होती की नव्हती, याची खातरजमा यानिमित्ताने होणार आहे. त्यामुळे आता मनसेद्वारे करण्यात आलेल्या मागणीला जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन कितपत महत्त्व देते, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

कोरोना काळात उपचार देणाऱ्या खासगी हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानांनी खरेदी केलेल्या औषधांच्या जीएसटी भरलेल्या बिलांची तपासणी करण्याची मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना अवाच्या सव्वा बिले आली आहेत. त्या बिलांचे जिल्हाधिकारी समितीने ऑडिट करून आत्तापर्यंत १ कोटी १३ लाख वसूल पात्र रक्कम रूग्णांना परत देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आजपर्यंत रुग्णांच्या खात्यावर ही वसुलपात्र रक्कम जमा झालेली नाही. ही रक्कम फक्त हॉस्पिटलची होती. त्यातच त्याच हॉस्पिटलमधुन रुग्णांना औषधे खरेदी करावी लागत होती. त्या औषधांची मेडिकलची बिले सुध्दा हजारो, लाखो रुपयांच्या घरात होती. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना कोणत्याही नातेवाईकाला रुग्णाला भेटू देत नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी ही औषधे खरेच वापरली गेली का, हा सवाल अनेक रुग्णांचा व रुग्णांच्या नातेवाइकांचा असुन पाच, दहा, पंधरा दिवसात रुग्णांना हजारो, लाखो रुपयांची औषधे कशी दिली, कोणती दिली, कधी दिली हे रुग्णांना व नातेवाईकांना माहीत नसून औषधांची हजारो, लाखोंची बिले रुग्णांवर लादली गेली. त्यामुळे या बिलांमध्ये सुध्दा मोठा भ्रष्टाचार असल्याचा संशय असुन नगर शहरात व जिल्ह्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलमधील कोरोनावर उपचार झालेल्या रुग्णांच्या औषधांची व त्याच काळातील संबंधित सर्व खाजगी हॉस्पिटल मधील मेडिकल दुकानाने खरेदी केलेल्या औषधांच्या बिलांची तपासणी करावी. 

तसेच कोरोना काळातील उपचार दिलेल्या सर्व खाजगी हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानाने औषधे खरेदी केलेल्या जी एस टी बिलांची तपासणी करावी. त्यामुळे ह्या हॉस्पिटल व मेडिकलने खरेच उपचारादरम्यान ही औषधे रुग्णांवर वापरली आहेत का नाही, हे समजुन येईल व औषधे वापरली नसल्यास आणि तसे आपल्या निदर्शनास आल्यास संबंधित हॉस्पिटलबरोबर संबंधित उपचार देणाऱ्या डॉक्टरवर व मेडिकल दुकानावर सुध्दा कारवाई करावी. तसेच मेडिकल न वापरलेल्या बिलांची सुध्दा रक्कम ही रुग्णांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post