कोरोना योद्ध्यांच्या घरात झळकणार 'ते' प्रेरणादायी चित्र

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना काळात रुग्ण सेवा, कायदासुव्यवस्था, गरीबांना अन्नदान वा अन्य माध्यमातून सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा अनोखा सन्मान येथील स्मायलिंग अस्मिता संस्थेद्वारे होणार आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांचे ३३१ वर्षांपूर्वीचे जुने तैलचित्र या कोरोना योद्ध्यांना भेट दिले जाणार असून, हे चित्र त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असणार आहे.

गेल्या १२ वर्षांपासून स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने शासनमान्य १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या एक दिवस अगोदर म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे शिवजयंती जन्मोत्सव जनजागृती कार्यक्रम होतो. दरवर्षी नवीन संकल्पना राबवल्या जातात. यंदा कोरोना योद्ध्यांचा छत्रपती संभाजी राजे यांची ब्रिटिश लायब्ररीमधील (लंडन) तैलचित्राची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची वेळ सकाळी साडे दहा वाजता आहे. लंडन लायब्ररीतील दक्षिण आशिया विभागप्रमुख जेरेमी लॉरिस्ट यांनी हे तैलचित्र जगासमोर पहिल्यांदा आणले होते. १९८६ साली प्रकाशित इंडियन बुक पेंटिंग्ज या पुस्तकात हे छापण्यात आले होते. या चित्राचे साल १६९० दिले आहे. हे चित्र कोरोनायोद्ध्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास स्मायलिंग अस्मिता संस्थेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या कोरोना योद्धे सन्मान कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सतीश सोनावणे, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, डॉ. शिवराज गुंजाळ, पुणे विद्यापीठ उपकेंद्र प्रमुख डॉ.नंदकुमार सोमवंशी, रचना कला महाविद्यालयाचे संचालक प्रशांत शेकटकर, न्यू आर्टस् महाविद्यालयाचे डॉ अमन बगाडे, मुकुंदनगर येथिल यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता बनकर कडलग, भाजीपाला व्यावसायिक नंदकुमार बोरूडे आणि टाकळी खातगाव येथील कबड्डी प्रशिक्षक सचिन नरवडे आदींचा यात समावेश आहे.याशिवाय स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्यात ६८ सदस्य ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले असल्याने त्यांनाही छत्रपती संभाजी राजे यांचे तैलचित्र भेट देण्यात येईल. मात्र, त्या तैलचित्राला फ्रेम नसेल ते ६८ जण स्वखर्चाने फ्रेम करून स्वतःच्या ग्रामपंचायत कार्यालयात हे तैलचित्र लावतील.

मिरवणूक नाही
स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने काढण्यात येणारी बैलगाडी मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून यंदा रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी येथील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयातील १२५ वर्षे जुन्या शिवाजी मंदिरात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असल्याचे स्मायलिंग अस्मिताचे यशवंत तोडमल यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post