पोटनिवडणूक ठरवणार अहमदनगरचा नवा महापौर? प्रभाग ९ पुन्हा चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर महापालिकेचा प्रभाग ९ म्हणजे दिल्लीगेट व तोफखाना परिसर मागील ३ वर्षांपासून चर्चेत आहे. आता नगरचा नवा महापौर हा प्रभाग ठरवणार असे दिसू लागले आहे. या प्रभागातील ९-क या सर्वसाधारण रिक्त जागेसाठी येत्या मार्चअखेरीस पोटनिवडणूक होण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेचा प्रभाग ९ हा मागील अडीच-तीन वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रभागातील तत्कालीन भाजप नगरसेवक व तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने त्याचा निषेध त्यावेळी राज्यासह देशविदेशातून झाला होता. त्यानंतर मनपाच्या तत्कालीन शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत केला. पुढे तो ठराव राज्याच्या नगरविकास मंत्रालयानेही कायम केला व पुढे न्यायालयातही त्यावर शिक्कामोर्तब झाल्याने छिंदमचे त्यावेळचे नगरसेवकपद रद्द तर झालेच, पण नंतर २०१८ मध्ये तो याच प्रभागातून अपक्ष निवडून आला असताना तेही नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यामुळेच आता या प्रभाग ९ मधील क या सर्वसाधारण रिक्त असलेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व प्रक्रिया होऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही पोटनिवडणूक अपेक्षित आहे. त्यात नगरच्या नव्या महापौराच्या उमेदवाराची उमेदवारी अपेक्षित असल्याने ही निवडणूकही गाजणार आहे. त्यामुळेच प्रभाग ९ आताही चर्चेत राहणार आहे.

प्रारुप मतदार यादी १६ फेब्रुवारीला
मनपाच्या ९-क या रिक्त जागेसाठी प्रारुप मतदार यादी येत्या १६ फेब्रुवारीला जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्य़ानंतर २३ फेब्रुवारीपर्यंत या मतदार यादीवर हरकती व सूचना देण्याची मुदत आहे. त्या निकाली काढून ३ मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ८ मार्चपर्यंत या प्रभागातील मतदान केंद्र संख्या निश्चिती होऊन १२ मार्चला मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार याद्या जाहीर होणार आहेत. त्यानंतर १५ दिवसात म्हणजे मार्चच्या अखेरीस प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम अंमलबजावणी अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रभागाचा नवा नगरसेवक मार्चअखेरीस निश्चित होण्याची शक्यता आहे.

आता राष्ट्रवादीही दावेदार
महापालिकेच्या डिसेंबर १८ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर जानेवारी १९ मध्ये नवा महापौर निवडला गेला. भाजपचे बाबासाहेब वाकळे हे राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पाठबळावर महापौर झाले आहेत. आता जूनमध्ये होणारा नवा महापौर महिला प्रवर्गातील असून, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेला या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या प्रवर्गाची नगरसेविका भाजपकडे नसल्याने त्यांच्याकडून या महापौरपदासाठी प्रयत्न होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची दावेदारी या पदावर असणार आहे व भाजपच्या नगरसेवकांचाही त्यासाठी त्यांना पाठिंबा मिळणे शक्य आहे. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीची राज्यात दोस्ती आहे. पण नगरमध्ये मात्र दुश्मनी आहे आणि राष्ट्रवादी-भाजप अशी य़ेथे दोस्ती आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत नेमक्या कोणत्या युत्या वा आघाड्या होतात, हे पाहणे उत्सुकतेचे असले तरी आताच्या प्रभाग ९च्या पोटनिवडणुकीत नेमक्या कोणत्या पक्षाकडून अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिलेची उमेदवारी होते, यावर पुढील महापौर निवडीची गणिते निश्चित होणार आहेत.

तो निकष महत्त्वाचा
अनुसूचित जाती महिला प्रवर्गाच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या पाच महिलांपैकी दोन शिवसेनेच्या तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसची प्रत्येकी एक महिला आहे. पण महापौर निवडणुकीत घोडेबाजारासाठी कोण आर्थिक ताकद लावू शकतो, या निकषावर या पदाच्या लाभार्थ्याचे नाव निश्चित होऊन अंतिम निवडही होते. भाजपची एक माजी नगरसेविका आयात करून तिला पावन करून घेऊन ९-क या प्रभागाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून उतरवले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसात नगरमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post