संगनमताने करू.. विकासकामे; नव्या आयुक्तांची महापौरांना ग्वाही


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर महापालिकेचे नवे आयुक्त शंकर गोरे गुरुवारी रुजू झाले. दहा दिवसांपूर्वीच त्यांची नियुक्ती नगर मनपाच्या आयुक्तपदी झाली होती. मात्र, ते हजर झाले नसल्याने उलटसुलट चर्चांना हवा मिळाली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतला व लगेच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भेट घेतली. संगनमताने काम केले तर विकास कामांना गती येऊ शकते, असा विश्वास या भेटीच्यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आयुक्‍त शंकर गोरे यांनी महापौर वाकळे यांची भेट घेतल्यावर शहर विकासाला गती द्यावी, अशी अपेक्षा महापौर वाकळे यांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. आयुक्‍त गोरे यांनी 25 फेब्रुवारीला महापौर वाकळे यांची भेट घेऊन शहर विकासावर चर्चा केली. यावेळी विकास कामांना गती देण्‍याच्‍या सूचना महापौर यांनी यावेळी केल्‍या, महापौर वाकळे पुढे म्‍हणाले की, शासनाच्‍या विविध योजनांची कामे प्रलंबित आहेत. या कामांना गती द्या तसेच शहरातील फेज 2 पाणी योजना, अमृत पाणी योजना व अंतर्गत भुयारी गटार योजनेची कामे जलद गतीने मार्गी लावावीत. करोना संदर्भातील विविध उपाययोजना कराव्‍यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर वाकळे यांनी आयुक्‍त गोरे यांचे शहरवासियांच्‍यावतीने स्‍वागत केले. यावेळी बोलताना आयुक्‍त गोरे म्हणाले की, सहकार्याची भूमिका प्रत्‍येकाने द्यावी व संगनमताने कामे केल्‍यास विकास कामांना गती येते. प्रशासकीय यंत्रणेकडून काम करून घेण्‍याची जबाबदारी ही माझी आहे व मी ती सक्षमपणे पार पाडीन, अशी ग्‍वाही दिली. यावेळी उपायुक्‍त यशवंत डांगे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक अविनाश घुले तसेच संजय ढोणे, अजय चितळे, मनोज ताठे, नगररचनाकार अजय चारठाणकर, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, पुष्‍कर कुलकर्णी उपस्थित होते.

चौकशी निवेदनही स्वीकारले
आयुक्त गोरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच शिव राष्ट्र सेना पक्षाचे अध्यक्ष संतोष नवसुपे व माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे व मनपाच्या सुरू असलेल्या विकास कामांच्या चौकशीचे निवेदन दिले. या वेळी नगर शहरातील अमृत योजनेतून 100 कोटी रूपये खर्च करून बोगस चाललेल्या कामाबद्दल तक्रार करण्यात आली. उपोषण व पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच देशात गो-हत्या बंदी असताना नगर शहरात राजरोसपणे चाललेली गोमांस विक्री तसेच पकडलेल्या 1100 किलो गोमांसची झालेली चोरी व त्यात खोटे गुन्हेगार पकडल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान व केंद्र सरकारसह राज्य सरकारने दिलेल्या निधीतून खरेदी केलेली 64 वाहने, त्यांच्याकडून स्वच्छतेबाबत होत नसलेला उपयोग व यामुळे कोट्यवधी रुपयांची नागरिकांच्या पैशाची होत असलेली उधळपट्टी आणि एवढे होऊनही 31-12-2020 रोजी बिले स्थगन प्रस्ताव असताना कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी विषय समजून घेऊन आंदोलन तूर्त करु नये व आम्हाला यावर कारवाई करण्याची वेळ द्यावी, असे सुचवले. यावर शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने कारवाई व चौकशीला वेळ देण्यात येईल, पण यावर योग्य कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याची माहिती संतोष नवसुपे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post