मनपात 'या' कोतकरांचा होणार अनोखा विक्रम


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर महापालिकेतील एखादे सत्तापद कार्यकाल संपला तरी सोडण्याचे अनेकांना जीवावर येते. पण केडगावचे मनोज कोतकर याला अपवाद ठरण्याची चिन्हे आहेत. स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान होऊन त्यांना अवघे चार महिने होत असतानाच आता त्यांना या पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे. मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ताकारणात अनेकांना पदांच्या माध्यमातून पावन करून घेण्याच्या नियोजनाने कोतकरांना आता स्थायी समितीचे सभापतीपद सोडावे लागणार आहे. त्यांच्या जागी नव्या सभापतींच्या नावांबाबत सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे व भाजपचे स्वप्निल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. पण यातील वाकळे आता निवृत्त होत आहेत तर शिंदे अजून समितीचे सदस्यही नाहीत. त्यामुळे त्यांना आधी स्थायी समितीत शिरकाव करून घेण्याचे आव्हान असणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीतील शिवसेनेचे सुभाष लोंढे, सुवर्णा जाधव व योगीराज गाडे, राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे व गणेश भोसले, भाजपच्या सोनाली चितळे व आशा कराळे आणि बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख असे ८ सदस्य त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल संपल्याने निवृत्त झाले आहेत. त्यांच्या या रिक्त जागांवर नवे ८ सदस्य नियुक्त करण्यासाठी येत्या १० फेब्रुवारीला दुपारी १ वाजता महासभा होणार आहे. या सभेत हे नवे सदस्य निवडल्यानंतर १६ सदस्यांच्या या समितीला नव्या सभापतीपदाचे वेध लागणार आहे. त्यामुळेच विद्यमान सभापती कोतकर यांना अवघ्या चार-साडेचार महिन्यात पदावरून बाजूला व्हावे लागणार आहे. मागील सप्टेंबर २०२०च्या अखेरीस या पदावर ते विराजमान झाले होते. मोठे राजकीय नाट्य त्यावेळी घडले होते. भाजपचे नगरसेवक म्हणून भाजपच्याच कोट्यातून स्थायी समितीवर दुसऱ्यांदा सदस्य झालेले कोतकर सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून त्यांचे झाले व त्यांच्याकडूनच उमेदवारी करून बिनविरोध सभापतीही झाले. ते राष्ट्रवादीचे असल्याने परिणामी महाविकास आघाडीचे असल्याचे सांगितले गेल्याने शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला अर्ज मागे घेतला व कोतकर बिनविरोध सभापती झाले. त्यानंतरही कोतकर नेमके भाजपचे की राष्ट्रवादीचे, यावरूनही गदारोळ उडाला होता. या दोन्ही पक्षांकडून ते आमचेच असेही सांगितले गेले. पण त्यांनी स्वतः मात्र ते नेमके कोणाचे हे स्पष्टच केले नाही. मात्र, त्याच वेळी त्यांचा सभापतीपदाचा कार्यकाल अवघा चार महिन्यांचा असेल की दीड वर्षाचा, अशी अशी चर्चा होती. कारण, मनपाच्या इतिहासात केवळ ८ सदस्य असतानाही दोन-दोन वर्षे स्थायी समितीवर नवे सदस्य नियुक्त झाले नाही व नवा सभापतीही निवडला गेला नाही, अशी परंपरा असल्याने कोतकरांकडूनही केवळ ८ सदस्यांच्या मदतीने आणखी वर्षभर सभापतीपद सांभाळले जाण्याची शक्यता होती. पण ती आशा आता मावळली आहे. स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर नवे ८ सदस्य नियुक्त झाल्यावर नियमाप्रमाणे नव्या सभापतीपदाची निवड होते. त्यामुळे येत्या १० रोजी नवे सदस्य नियुक्त झाल्यावर आठवडाभरात नव्या सभापतीपदाची निवडणूक होऊ शकते. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्याअखेरीस या समितीला नवा सभापती मिळणार आहे. फक्त तो आता भाजपचा असेल की राष्ट्रवादीचा, हा प्रश्न उरला आहे.

दोनजण इच्छुक
स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे यांचेही नाव आहे. पण नव्या सभापतीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच मनपा सभागृहनेतेपदावरून पायउतार झालेले भाजपचे स्वप्निल शिंदे यांनाही स्थायी समितीच्या सभापतीपदाची आशा आहे. त्यामुळे आधी या दोघांनाही आपापल्या पक्षाच्या कोट्यातून स्थायी समितीवर सदस्य म्हणून यावे लागणार आहे व सध्या त्यांच्या समर्थकांकडून त्यासाठीची फिल्डींग जोरात सुरू आहे. ती यशस्वी झाल्यावर मग नव्या सभापतीपदी त्यांच्यापैकी कोण विराजमान होते, याची उत्सुकता असणार आहे. दरम्यान, महापालिकेची स्थायी समिती ही मनपाच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने सभापतीपदाच्या एक वर्षाच्या कार्यकालाआधी याआधीच्या कोणत्याही सभापतीपदाने आपले पद सोडले नाही. पण मनोज कोतकरांच्या वाट्याला हे भाग्य आले नाही. अवघ्या साडेचार महिन्यातच त्यांना हे पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे मनपाच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीचा सभापती, हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला जाणार आहे. किमान आणखी दोन-तीन महिन्यांसाठी तरी हे पद त्यांच्याकडे राहावे, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ता समीकरणानेच त्यांना सभापतीपद मिळाले असल्याने आता याच सत्ता समीकरणातून त्यांना हे पद सोडावे लागणार असल्याचे दिसू लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post