सभापतीपद शर्यतीत सेना-राष्ट्रवादी व भाजपही..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या शर्यतीत शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपही उतरणार असल्याची महापालिकेत चर्चा आहे. पण स्थायी समिती सदस्यांचे बलाबल पाहता या तीनही पक्षांपैकी कोणत्याही दोन पक्षांना सहमतीने वाटचाल केली तरच दोघांपैकी एकाला सभापतीपदाचा लाभ मिळू शकणार आहे. मनपा राजकारणातील राष्ट्रवादी-भाजप आघाडी सभापती निवडीतही कायम राहते की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणे राष्ट्रवादी व शिवसेना यांची नवी आघाडी महापालिकेत अवतरते, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. दरम्यान, सभापती निवडीचा प्रस्ताव प्रशासनाने अंतिम केला आहे.

स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी महापालिकेकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आता विभागीय आयुक्तांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यावर त्यांच्याद्वारे सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र, प्रशासनाकडून सभापती निवडीचा प्रस्ताव सादर होताच राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.

मागील आठवड्यात स्थायी समितीच्या रिक्त जागांवर नवीन आठ सदस्यांच्या निवडी झाल्या. मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन सदस्य निवडीनंतर नवीन सभापतींची निवड केली जाते. त्यासाठी महापालिकेकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जातो. गेल्या तीन दिवसांपासून हा प्रस्ताव तयार होता. मात्र, आयुक्तांची प्रस्तावावर स्वाक्षरी न झाल्याने प्रस्ताव रखडला होता. सोमवारी रात्री उशिरा आयुक्तांनी प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. आता त्यांच्याकडून प्रतीक्षा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नियुक्तीची आहे. आणि ही नियुक्ती झाल्यावर त्यांच्याकडून प्रत्यक्ष सभापती निवडणुकीची तारीख कधी जाहीर होते, याची उत्सुकता असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post