'त्या' दोन वादग्रस्त मार्केटसह तिसरे मार्केट मनपाच उभारणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर शहरातील चितळे रस्त्यावरील जुन्या नेहरू मार्केटच्या जागी नवीन मार्केट करण्याचा मागील १० वर्षांपासून रेंगाळलेला प्रकल्प तसेच सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील सध्याचे मार्केट पाडून तेथे नवे मार्केट उभारण्याचा व राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह भ्रष्टाचाराच्या आरोपाने गाजलेला विषय आता पुन्हा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. नेहरू मार्केट व प्रोफेसर कॉलनी मार्केट खासगीकरणातून उभारायचे की नाही, यावरून नगरचे राजकारण नेहमी पेटते राहिले आहे. मात्र, ही दोन्ही मार्केट आता मनपा स्वतः उभारणार आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तसे स्पष्ट केले असून, या दोन मार्केटसह सावेडीतील जुन्या एनसीसी ऑफिस जागेवरही नवे मार्केट मनपाद्वारेच उभारले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. या तिन्ही मार्केटसाठी मनपा प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया राबवण्याचे आदेशही दिले आहेत. 

शहरातील विविध प्रलंबित विकास कामांबाबत मनपा नगररचना विभाग, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, अमृत पाणी योजना, फेज-2 पाणी योजनेच्‍या विभागाच्‍या बैठकीत महापौर वाकळे यांनी विविध सूचना केल्‍या. यावेळी उपायुक्‍त डॉ.प्रदीप पठारे, संजय ढोणे, निखील वारे, सतीश शिंदे, नगररचना विभाग प्रमुख राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते उपस्थित होते.

महापौर वाकळे म्हणाले की, बांधकाम परवान्‍यासाठी नागरिकांना तात्‍काळ परवानगी द्यावी. फायलींचा प्रवास कमीत कमी दिवसात करून विकास कामांना तातडीने मंजुरी द्यावी. प्रत्‍येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी तसेच शहराला पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होण्‍यासाठी अमृत पाणी योजनेच्‍या पाईप लाईन टाकण्‍याच्‍या कामास गती दिली असून, ते काम वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. या कामातील अडथळे दूर झाले असून लवकरच शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. फेज-2 पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाच्‍या विविध योजनेची कामे शहरात सुरू असून लवकरात लवकर ही कामे मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने काम करावे. शहरामध्‍ये विविध विकास कामे प्रभागामध्‍ये मंजूर आहेत. तसेच मनपा फंडातील कामे मंजूर आहेत. याकामांच्‍या निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्‍याने अनेक रस्‍त्‍यांची कामे प्रलंबित आहेत. यासाठी निविदा प्रक्रियेवर अनेक अधिकाऱ्याांच्‍या सह्या घ्‍याव्‍या लागत आहेत व त्‍या कमी करण्‍यासाठी उपाययोजना कराव्‍यात व बांधकाम विभागालाच मंजुरीचा अधिकार द्यावा. छाननी प्रक्रियेतही एखादा अधिकारी सुट्टीवर असल्‍यास छाननी प्रक्रियेला विलंब होत आहे. तो टाळण्यासाठी दुसऱ्या दिवशी छाननी प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश महापौर वाकळे यांनी दिले.

ते रस्तेही ऐरणीवर
गंगा उद्यानाशेजारील रस्‍ता औरंगाबाद रस्‍त्‍याला जोडणारा आहे. या रस्‍त्‍याचे काम 90 टक्‍के पूर्ण झाले असून काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या रस्‍त्‍याचे काम पूर्ण करावे. तारकपूर रोड ते विभागीय एसटी डेपोला जोडणा-या रस्‍त्‍यावरील अतिक्रमण हटवून रस्‍त्‍याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. सीना नदी लगतचा डीपी रस्‍ता बालिकाश्रम रोड पंपीग स्‍टेशन ते कल्‍याण रोडला जोडणारा हा नवान रस्‍ता मनपा निर्माण करणार आहे. नगररचना विभागाने तात्‍काळ कार्यवाही सुरू करावी. जेणे करून या रस्‍त्‍यामुळे शहर विकासाला चालना मिळणार आहे, असे ते म्‍हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post