जरे हत्याकांड : 'त्यांना' चुकीची माहिती मिळाली की त्यांनीच..?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला ९० दिवस झाले असून, पोलिसांनी या प्रकरणात पाचजणांना पकडले असले तरी या खुनाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर ११ दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बोठेचा सुगावा लागल्याचे सुतोवाच केले होते. पण अजूनपर्यंत हा सुगावा प्रत्यक्षात आलेला नाही. त्यामुळे मुश्रीफांना कोणी चुकीची माहिती दिली की, त्यांनीच स्वतःहून तपासाचा दबाव कमी व्हावा म्हणून असे वक्तव्य केले, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

३० नोव्हेंबर २०२० रोजी रेखा जरे यांची हत्या झाली आहे. त्यानंतर ३ डिसेंबरला या प्रकरणाचा सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनीच खुद्द जाहीर केले आहे. मात्र, या तारखेनंतर आतापर्यंत जंग जंग पछाडूनही बोठेचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर, १३ दिवसांपूर्वी पोलिस मुख्यालयात १६ फेब्रुवारीला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगरच्या पोलिस दलाला जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून २० गाड्या देण्याचा दणकेबाज कार्यक्रम झाला व या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा पोलिसांना सुगावा लागल्याचे आशादायक विधान केले होते. पण या विधानाला आता १३ दिवस होऊन गेले तरी ना बोठेचा सुगावा लागला ना पोलिसांना त्याची काही माहिती मिळाली. त्यामुळेच पालकमंत्री मुश्रीफ यांना बोठेचा सुगावा लागल्याची कोणी चुकीची माहिती दिली की, त्यांनीच जरे प्रकरणातील फरारी आरोपी तीन-तीन महिने सापडत नसल्याच्या दबावातून वेळ मारून नेण्यासाठी त्याचा सुगावा लागल्याची माहिती दिली, याची आता चर्चा रंगू लागली आहे.

पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले होते, रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या संदर्भात पोलिसांचा तपास प्रगतीपथावर आहे, गावाचे नाव सांगणे योग्य नाही, पण तो कुठे आहे, याची माहिती मिळाली आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. पण त्यानंतरही आतापर्यंत बोठेची माहिती व ठावठिकाणा पोलिसांना मिळालेला नाही. पोलिसांवर काही राजकीय दबाव आहे काय, याचेही स्पष्टीकरण पोलिसांकडून होत नाही. या पार्श्वभूमीवर, तो सापडत नसल्याने पोलिसांनी बाकी तपासाची सुत्रे गतीने हलवून पुरावा संकलनाचे काम भक्कम केल्याचे सांगितले जाते व त्यामुळेच जिल्हा न्यायालयात आणि औरंगाबाद खंडपीठातही बोठेचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले गेले आहेत. तसेच पारनेर पोलिसांनी त्याच्याविरोधात दिलेल्या स्टँडींग वॉरंटला त्याने घेतलेला आक्षेपही फेटाळला गेला आहे. पण एकीकडे ही सकारात्मक बाजू असताना दुसरीकडे खुद्द बोठे पोलिस यंत्रणेला अजूनही सापडत नाही, याचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. बोठे सापडत नसल्याने रेखा जरे यांच्या हत्येचे कारणही अजून गुलदस्त्यात आहे. शोध घेऊनही तो सापडत नसल्याने पोलिसांनी आता पकडलेल्या ५ आरोपींविरुद्ध न्यायालयात चार्जशीट (आरोपपत्र) दाखल करण्यात आले आहे.

1 Comments

  1. साहेब फरार आरोपी बाळ एखाद्या वेळेस पालकमंत्री या पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्यावर तर लपुन बसला नाही ना

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post