अहमदनगर जिल्ह्याला लागले 'त्या' पदाचे वेध.. थोरातांनी व्यक्त केली कृतज्ञता


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्रीपद निर्माण होते का व ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला मिळते काय, याचे वेध आता जिल्ह्याच्या राजकीय विश्वाला लागले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन करताना मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कार्यकाळात मदत करणाऱ्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडून दिले व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदी शिवसेनेला संधी व आणखी एक उपमुख्यमंत्रीपद निर्माण करून तेथे काँग्रेसला संधी देणे व या पदावर काम करण्याची संधी नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देण्याबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे. ही चर्चा प्रत्यक्षात आली तर नगर जिल्ह्याला थोरातांच्या रुपाने दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. याआधी मूळचे श्रीरामपूरचे रहिवासी बॅरिस्टर रामराव आदिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. त्यामुळे आता त्यांच्यानंतर थोरातांना हा सन्मान मिळतो की नाही, याची उत्सुकता जिल्हावासियांना आहे. सुमारे पावणे दोन वर्षांपूर्वीच्या लोकसभा व दीड वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकांच्या काळात अनेक दिग्गज काँग्रेस नेते भाजपमध्ये गेले असताना प्रदेशाध्यक्ष थोरातांनी संयमाने स्थिती हाताळून पक्षाला संजीवनी देण्याचे काम केले तसेच शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापण्यातही मोलाची भूमिका बजावली. आतापर्यंत ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेते व महसूल मंत्री अशी तिहेरी जबाबदारी सांभाळत होते. आता प्रदेशाध्यक्षपदाची त्यांची जबाबदारी कमी झाली असल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळते की नाही, याची उत्सुकता नगर जिल्ह्यासह राज्यभरात आहे.

राष्ट्रवादीची भूमिका व नंतरची स्पर्धा महत्त्वाची
राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येताना मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे व विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असे वाटप झाले आहे. मात्र, आता काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्षपद सोडले आहे. त्यामुळे या पदावर शिवसेनेला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी एक उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याचा व ते काँग्रेसला देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जाते. पण राष्ट्रवादीकडून आणखी एक उपमुख्यमंत्रीपद निर्मितीलाच विरोध आहे, शिवाय असे उपमुख्यमंत्रीपद निर्माण होऊन ते काँग्रेसला दिले तर सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांसाठीही तिसरे उपमुख्यमंत्रीपद करावे लागेल, असे मंत्री बच्चू कडू यांनीही स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत एवढे होऊनही दुसरे उपमुख्यमंत्रीपद निर्माण झालेच तर त्यावर कोणाला बसवायचे, याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी घेणार आहे व त्यावेळी काँग्रेस अंतर्गत रस्सीखेचही रंगात येणार आहे. त्यामुळे थोरातांचे उपमुख्यमंत्रीपद सध्याच्या स्थितीत धुसर दिसत आहे. पण ते त्यांना मिळावे व मिळाले तर तो त्यांच्या पक्षनिष्ठेचा व नगर जिल्ह्याचाही सन्मान ठरणार असल्याचेही आवर्जून सांगितले जाते आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये या नव्या पदाची निर्मिती होते का व त्यावर थोरातांची निवड होते की काँग्रेस पुन्हा विधानसभा अध्यक्षपद स्वीकारून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांना या पदावर नियुक्त करते, याविषयीही जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात आहेत.

काँग्रेस होणार आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर टीका करीत भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी सरकारमधील काँग्रेसचा सहभाग अधिक आक्रमक करण्यासाठी पटोलेंची या पदावर नियुक्ती केल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर पक्ष संघटना बळकटीकरणासाठी पटोले यांच्या मदतीला सहा कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नासीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम.एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करीत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढत त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. या सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी होती.

थोरातांनी व्यक्त केली कृतज्ञता
काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे. पददलित आणि सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा आहे. आजवर आम्ही प्रामाणिकपणे हा विचार जपला आणि वाढवला. आता राज्यातील पक्ष संघटनेचे नवे शिलेदार काँग्रेसचा विचार आणि संघटन बळकट करण्यासाठी पूर्ण वेळ आणि गतीने कार्यरत राहतील, अशा शब्दात मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भावना व्यक्त करताना प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात साथ दिल्याबद्दल पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी आ. नाना पटोले यांची निवड झाली, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सरकार आणि संघटना दोन्ही पातळीवर काँग्रेस जनतेचा आवाज बनून काम करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अनंत अडचणी असतानाही महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भक्कमपणे माझ्यासोबत उभे राहिले. आम्ही धर्मांध जातीयवादी शक्तींविरोधात एकजुटीने आणि निकराने लढाई लढलो. महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने नव्या व्यक्तीकडे द्यावी, ही अपेक्षा मी सातत्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे व्यक्त करत होतो. काँग्रेसचे कार्य अधिक चांगले व्हावे, ही माझी अपेक्षा आहे. आज तो निर्णय झाला आहे. गेल्या दीड वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला विलक्षण प्रेम दिले. रात्रीचा दिवस करून अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली, त्या सर्वांचे आभार ! माझे ज्ञात-अज्ञात हितचिंतक, मित्रांचेही आभार!, अशा भावनाही थोरातांनी यानिमित्ताने व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post