उड्डाणपुलाचे नामकरण; राजकीय वाद रंगण्याची चिन्हे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर शहरात स्टेशन रस्त्यावरील सक्कर चौक ते जीपीओ चौकादरम्यान होत असलेल्या ३ किलोमीटर अंतराच्या उड्डाण पुलाला कोणाचे नाव द्यावे, यावरून आता राजकीय वाद रंगण्याची चिन्हे आहेत. नगर शहरात शिवसेनेचे २५ वर्षे आमदार राहिलेले माजी आमदार दिवंगत अनिलभय्या राठोड यांचे नाव या पुलाला देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. पण आता त्यानंतर आणखी दोन मागण्या पुढे आल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या पुलास देण्याची मागणी झाली असून, आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव या पुलास देण्याची मागणीही झाली आहे. नगरच्या राजकारणात एकमेकांना शह देण्यासाठी पुलाचे नामकरण हा नवा विषय सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींना मिळाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात यावर घमासान चर्चा झडण्याची व राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या निधीतून होणाऱ्या या उड्डाण पुलाचे काम सध्या स्टेशन रस्त्यावरील जीपीओ चौक ते चांदणी चौकादरम्यान सुरू आहे. ते येत्या तीन-चार महिन्यात झाल्यावर त्यानंतर चांदणी चौक ते मार्केट यार्ड चौक व शेवटी मार्केट यार्ड चौक ते सक्कर चौक असे तीन टप्प्यात येत्या वर्षभरात हे काम होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आता या पुलाचे नामकरण चर्चेत आले आहे. मागील १२ फेब्रुवारीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नगरला आले असताना त्यांच्याकडे शहर शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी नगर शहरात होत असलेल्या उड्डाण पुलास माजी आमदार दिवंगत अनिलभय्या राठोड यांचे नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला त्यावेळी त्यांनी तत्वतः मान्यता देताना अशा नामकरणाबाबतचा ठराव मनपाच्या महासभेने मंजूर करून तो नगर विकास विभागाकडे पाठवण्याचे सांगितले होते. तशी स्पष्ट सूचना त्यांनी त्याच बैठकीत भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांना केली होती व त्यांनीही त्यानुसार आवश्यक कार्यवाहीची ग्वाही दिली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच या पुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली तर दुसरीकडे शहर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सर्व नगरसेवकांच्या सहमतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांना पत्र देऊन माजी आमदार अनिलभय्या राठोड यांचे नाव उड्डाण पुलासाठी देण्याच्या मागणीचा ठराव महासभेत करण्यासाठी तातडीने महासभा बोलावण्याची मागणी केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागानेही पत्र देऊन या पुलास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. उड्डाण पुलासाठी आता तीन नावांची मागणी झाल्याने मनपाच्या महासभेत या विषयाबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. अर्थात आधी प्रतीक्षा या ठरावासाठीच्या महासभेची असणार आहे. ही महासभा कधी होणार, याचीही उत्सुकता आहे व तशी ती झाली तर नामकरणाबाबत कोणत्या नगरसेवकाची काय भूमिका आहे, हेही यातून स्पष्ट होणार आहे. मात्र, यानिमित्ताने नामकरणाचा नवा विषय शहरातील सर्वपक्षीय राजकारण्यांना चर्चेसाठी मिळाला आहे व त्यावर सोशल मिडियासह माध्यम जगतात जोरदार चर्चाही झडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर उड्डाण पुल नामकरणाबाबतच्या तिन्ही मागण्यांची मांडणी अशी :

(स्व.) राठोड यांच्या नावाचा ठराव घ्यावा
नगर शहरात होणार्‍या उड्डाणपुलास माजी आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड यांचे नाव देण्याबाबतचा ठराव महासभेत घेण्यात यावा, अशी मागणी करणारे शिवसेनेच्या नगरसेवकांचे महापौर यांना पत्र दिल्याची माहिती संभाजी कदम यांनी दिली. (स्व.) अनिलभय्या राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे आमदार म्हणून शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान दिले आहे. दीर्घकाळ आमदार असताना त्यांनी शहर विकासास हातभार लावला आहे. नगरपालिका व त्यानंतर झालेल्या महानगरपालिकेच्या विविध अडचणी त्यांनी मंत्रालयस्तरावर तसेच वरिष्ठ पातळीवरुन सोडविल्या. त्याचबरोबर प्रत्येकवेळी मनपासाठी विशेष निधी मिळविण्यातही त्यांचा पुढाकार असे. शहराचे लाडके नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव होतो. अशा सर्वसामान्यांशी नाळ जोडली गेलेल्या (स्व.)अनिलभय्या राठोड यांच्या कार्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी शहरात होणार्‍या उड्डाण पुलास (स्व.)अनिलभय्या राठोड यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. याबाबत संभाजी कदम यांनी यापूर्वी दि.6/8/2020 रोजी मनपा आयुक्त, महापौर, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, उपअभियंता राज्य महामार्ग, अधीक्षक अभियंता, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांनाही पत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव घेऊन तो संबंधितांना पाठविण्यात यावा. याबाबत शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारीही अनुकूल आहेत. तसेच नुकतेच नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे नगर दौर्‍यावर आले असता त्यांनाही याबाबत कल्पना दिली, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मनपाचा ठराव करुन द्यावा, असे सुचविले आहे. तरी आपण याबाबत मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव घ्यावा, असे पत्र शिवसेनेच्या नगरसेवकाच्या संमतीने महापौर यांना देण्यात आले असल्याचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सागितले.

डॉ. आंबेडकरांचे नाव द्यावे
शहरातील उड्डाणपुलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांच्यावतीने करण्यात आली असून, तसे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. शहरात उड्डाणपुलाचे काम सुरु असून, या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), आंबेडकरी संघटना व ख्रिश्‍चन आघाडीच्यावतीने देण्यात आले. यावेळी आरपीआयचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, अमित काळे, अविनाश भोसले, राहुल वैराळ, दीपक गायकवाड, आरपीआय गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे, सोन्याबापू सूर्यवंशी, शिवराम पाटोळे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील सक्कर चौक ते अशोका हॉटेल चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. अनेकवेळा डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकरांनी नगर शहराला भेट दिल्याचा इतिहास आहे. शहराशी त्यांचे भावनिक नाते जोडले गेले असून, या उड्डाणपुलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सर्व आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर उड्डाणपुलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे
शहरातील उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाने केली आहे. यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौकादरम्यान प्रस्तावित उड्डाणपुल उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून, या पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, ताज खान, शहानवाझ शेख, सुफीयान शेख, सुजात दिवटे, नयना शेलार, सरफराज कुरेशी, शाहरुख शेख, वसीम शेख, सोहेल सय्यद आदी उपस्थित होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद शहराच्या धर्तीवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहतूक सुरळीत असावी, या हेतूने शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. अहमदनगर शहराला दीडशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास अहमदनगरशी जोडला गेलेला आहे. शिवाजी महाराज हे सर्व समाजाची अस्मिता व भूषण आहे. शहरातील सदरील उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे प्रशासकीय स्तरावर नामकरण होणे, ही प्रत्येक नगरकराची इच्छा आहे. या उड्डाणपुलास कोणत्याही राजकीय पुढार्‍याचे नाव देण्यात येऊ नये. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने स्थानिक शहरवासियांच्या मागणीचा विचार करून शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post