एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अहमदनगर येथील एमआयडीसीमधील इंडियन सीमलेस कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत. दोन वर्षांपासून कराराचे नुतनीकरण केले जात नसल्याने नगरमधील तिन्ही युनिटमधील कामगार व नगर जिल्हा मजदूर सेनेच्या पदाधिकार्यांनी गेट मिटींग घेऊन कंपनीला 72 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यानंतर बुधवारपासून (दि.10) आंदोलन पुकारत कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी (दि.7) सायंकाळी संघटनेचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्हा मजदूर सेनेची गेट मिटिंग पार पडली. यावेळी सचिव वसंत सिंग, तिन्ही युनिटचे अध्यक्ष राजू वाकळे, बाबा कोतकर, किरण घाडगे आदींसह सर्व कामगार व कंत्राटी कामगार उपस्थित होते.
कंपनी व्यवस्थापन दोन वर्षांपासून करार करण्यास चालढकल करत आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात चार हजार रुपये वेतनवाढ करण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. परंतु व्यवस्थापनाकडून दोन वर्षे सोडून एप्रिल 2021 पासून वाढ करू, असे तोंडी सांगत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी गेट मिटिंग घेण्यात आली. बुधवारी सकाळी आंदोलनाची दिशा ठरवून बहुतेक सर्व कामगार संपावर जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, कोरोना आपत्ती काळात प्रत्येक कामगाराने कंपनीला पंचवीस हजार रुपये मदत दिली. असे कुठेही, कुणीही, कोणत्याही कंपनीत कर्मचार्यांकडून मदत दिली गेलेली नाही. माणुसकीच्या भावनेने आम्ही ही मदत दिली. मात्र, दोन वर्षांपासून कंपनी नवीन करार करण्यास चालढकल करत आहे. सध्या कंपनीची परिस्थिती अत्यंत चांगली असतानाही करार करण्यास तयार नाही. त्यामुळे कामगारांच्या रोषालाही संघटनेला सामोरे जावे लागले. कंपनी बंद पडू नये, ही आमची इच्छा आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागत होतो. कंपनीतील सुमारे 150 कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी कंत्राटी कामगार कायम करावे, ही आमची मागणी आहे. नगरमध्ये जर संप झाला तर कंपनीच्या जेजुरी व बारामती येथील युनिटचे कामगारही संपावर जातील. त्यामुळे व्यवस्थापनाने आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नये व नवीन करार करावेत, अशी भूमिका टायरवाले यांनी मांडली.
सचिव वसंतसिंग म्हणाले की, कोरोना काळात पोलिसांच्या काठ्या खाऊन कामगारांनी कंपनी चालवली. आज चीनचा मालच येत नसल्याने, त्यावर बंदी असल्याने मीटर ट्यूबची दर महिन्याला 350 टनांपेक्षा जास्त विक्री होत आहे. कंपनी पूर्ण फायद्यात आहे. तरीही करार न करणे हे योग्य नाही. कंपनीची परिस्थिती सुधारली असून ऑर्डरही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. कंपनी व्यवस्थापन कामगारांवर दबाव आणत असून परप्रांतीय सुरक्षा एजन्सीला पाचारण केले आहे. सुरक्षा रक्षक हातात दांडके घेऊन कंपनीच्या आतमध्ये फिरत आहेत. असा प्रकार कुठेही घडत नाही. यामुळेही कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे.
व्यवस्थापन एकीकडे आमच्याशी चर्चा करते व लगेच संध्याकाळी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे जाऊन आमच्या विरोधात खोट्या तक्रारी करतेय. आम्ही दहशत निर्माण करतो, असे अर्ज दिले जात आहेत. दोन वर्षे आम्ही थांबलो आहोत. पण आता थांबणार नाही. आता जर करार केले नाहीत, तर बुधवारी सकाळपासून आमचे आंदोलन ठरलेले आहे. संघटनेच्या वतीने आंदोलनाबाबत, होत असलेल्या अन्यायाबाबत कामगार आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख, प्रशासन व पोलिसांना निवेदन देण्यात आलेले आहे. आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची असेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
Post a Comment