जरे हत्याकांड : बोठेने दिले पोलिसांना आणखी एक आव्हान


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याने आणखी एक आव्हान नगरच्या पोलिसांना दिले आहे. जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र, तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. तसेच पोलिसांनी पारनेर न्यायालयात त्याच्याविरुद्ध मागितलेल्या स्टँडींग वॉरंटच्या मागणीलाही त्याने आक्षेप घेतला होता. पण ती मागणी त्या न्यायालयाने फेटाळल्याने आता या निर्णयास त्याने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच्या या आव्हान अर्जावर येत्या ६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

रेखा जरे हत्याकांडामधील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्ध पारनेर न्यायालयाने स्टॅंडिंग वॉरंट मंजुरी दिल्यानंतर त्या मंजुरीला आरोपी पत्रकार बाळ मोठे याने जिल्हा न्यायालयामध्ये आक्षेप घेतला असून आव्हान अर्ज दाखल केला आहे. त्याबाबतची सुनावणी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या सुनावणीत काय होते, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

रेखा जरे खून प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी पत्रकार बोठे अद्याप पसार आहे. नगर जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने त्याचे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. घटना उलटून साठ दिवस झाले, पण अद्यापपर्यंत पोलिसांना तो सापडू शकलेला नाही. या घटनेचा तपास डीवायएसपी अजित पाटील यांच्याकडे आहे. पारनेर न्यायालयामध्ये पोलिसांच्यावतीने त्यांनी स्टॅंडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळेला बोठेने त्या अर्जाला आक्षेप घेतला होता. न्यायालयाने त्याची व पोलिसांची बाजू ऐकल्यानंतर पोलिसांच्या स्टॅंडिंग वॉरंट मागणीला मंजुरी दिली होती. या वॉरंटमुळे पोलिसांनी बोठेची माहिती राज्यभरातील सुमारे अकराशे पोलीस ठाण्यास पाठवून त्याच्या शोध कार्यात त्यांना सामावून घेतले होते. देशातील प्रमुख ठिकाणीही या वॉरंटच्या आधारे त्याचा शोध घेतला आहे. मात्र, आता बोठेने या वॉरंटविरुद्ध न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ६ फेब्रुवारीला याबाबत होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. पोलीस यासंदर्भात आपले म्हणणे आता सादर करणार आहेत त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

माहिती संकलन सुरू
औरंगाबाद खंडपीठाने बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केल्यानंतर पोलिसांची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोपी बोठे याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचीसुद्धा प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांच्यावतीने त्याच्या संपत्तीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा न्यायालयात बोठेने दाखल केलेल्या स्टँडींग वॉरंट आव्हान अर्जावर काय निर्णय होतो, यावर पोलिसांच्या पुढील प्रक्रियेचा वेग अवलंबून असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post