जरे हत्याकांड : 'त्याच्य़ा' संपत्तीवर येणार टाच; पोलिसांची प्रक्रिया झाली सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांड प्रकरणामध्ये असलेला मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेने जिल्हा न्यायालयमध्ये स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात दाखल केलेला पुनरिक्षण अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांकडून आता त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिस प्रशासनाने त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, जरे खून या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
आरोपी बोठे याने पारनेर न्यायालयाने दिलेल्या स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये पुनरिक्षण अर्ज केला होता. यावर सुनावणी होऊन बोठे याने दाखल केलेला अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता बोठेविरुद्धच्या पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.

पोलिसांनी सुरू केली प्रक्रिया
पोलिसांनी बोठेचा नेहमी काहीना काही कारणाने संपर्क येत असलेल्यांपैकी काहीजणांचे जबाब घेतलेले आहे. याशिवाय अन्य 30 ते 40 जणांचे जबाब सुद्धा पोलिसांनी जरे यांच्या खुनाच्या घटनेमध्ये नोंदलेले आहे तसेच बोठेच्या संपत्तीची चौकशी सुद्धा पोलिसांनी सुरू केली होती. त्याची माहिती एकत्रितपणे गोळा करण्यात येत होती. पोलिसांनी त्याच्या असलेल्या एका ट्रस्टची सुद्धा माहिती मागवलेली आहे. त्या ट्रस्टमध्ये कुणीकुणी कशा स्वरूपाचे पैसे दिले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यातच आता न्यायालयाने त्याचा पुनरिक्षण अर्ज फेटाळून लावल्यानंतर आता त्याच्या संपत्तीवर टाच आणून तिचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र होणार
दुसरीकडे रेखा जरे हत्याकांड प्रकरणामध्ये या अगोदर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधामध्ये येत्या चार दिवसात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करणार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी आरोपी बोठे याच्या संपत्तीची चौकशी सुरू केल्यानंतर अनेक बाबी उजेडात आलेल्या आहेत. त्यामुळे न्यायालयामध्ये आता अर्ज दाखल करताना संपत्तीवर टाच आणण्यासह त्याची विक्री करण्याची सुद्धा परवानगी मागणारा एकत्रितपणे अर्ज पोलिस देणार असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post