स्नेहलता कोल्हेंचा पवार व ठाकरेंवरील हल्लाबोल चर्चेत

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केलेला हल्लाबोल सध्या चर्चेत आहे. वीज बिल माफीसंदर्भात कोपरगाव भाजपने काढलेल्या मोर्चात स्नेहलता कोल्हे यांनी पवार व ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी कोपरगाव भाजपने महावितरण कंपनीवर मोर्चा नेला होता. त्यावेळी बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोरोना काळात जनतेला वीज बिलमाफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार असंवेदनशील आहे. सत्तेनंतर मग्रुरी अंगात आल्याने विज कट करून जनतेला अंधारात ढकलण्याचे पातक करणाऱ्या या सरकारला आम्ही मनमानी करू देणार नाही, असा इशारा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आंदोलनाच्यावेळी दिला.

यावेळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, शहराध्यक्ष दत्ता काले, शिल्पा रोहमारे, अरुण येवले, स्वप्निल निखाडे, विजय वाजे,अविनाश पाठक, बाळासाहेब पानगव्हाणे, बबलू वाणी, प्रदीप नवले आदी उपस्थित होते.

पवार दुटप्पी तर ठाकरेंची तडजोड
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. यामुळे थकबाकी वाढली तरी तो भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. आमचे राज्य असताना कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीजजोडण्या दिल्या. पण वीज कंपन्याही फायद्यात राहिल्या होत्या. जर आम्हाला हे शक्य होते तर आताच्या सरकारला का कठीण आहे,असा सवालही त्यांनी केला. १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची ऊर्जा मंत्र्यांची घोषणा म्हणजे खोटे आश्वासन असून "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" आहे. दिल्लीतील शेतकर्‍यांबद्दल कळवळा दाखविणारे व राज्यातील शेतकऱ्यांची वीज कट करणाऱ्या आघाडी सरकारची ही कृती म्हणजे दोन्हीकडूनही ढोलकी बडविणारी असल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांबाबत शरद पवारांचे धोरण राज्यात एक आणि देशात एक असे दुटप्पी धोरण असून हे म्हणजे वाहत्या गंगेत हात धुवून राजकीय पोळी भाजण्यासारखे आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील द्वेषापोटी शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधणारे हे कृत्य राजकीय षडयंत्र असून यामागे देश विघातक प्रवृत्ती आहेत, असा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही त्यांनी टीका केली, त्या म्हणाल्या, एल्गार परिषदेत शरजील उस्मानीचे वक्तव्य अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारे विधान आहे. असे असताना आम्ही मात्र सर्वजण गप्प असल्याचे पाहून आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रकर्षाने आठवण झाली. ते असते तर त्यांनी ही मुजोरी सहन केली असती का? असा प्रश्न मनात निर्माण होतो. इथे मात्र आज खुर्ची आणि सत्तेसाठी कोणीही काहीही बोलले तर खपवून घ्यायचे, ही तोडजोड मनाला वेदना देणारी आहे, अशी खंत स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post