'त्या' ५९हजार जणांनी थकवले तब्बल ३३ कोटी.. महावितरण अजूनही विनंतीच्या मूडमध्ये

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना काळातील दहा महिन्यात एकदाही वीज बिल न भरणारे अहमदनगर जिल्ह्यात ५९ हजार वीज ग्राहक असून, या मंडळींकडे तब्बल ३३ कोटी रुपये थकले आहेत. त्यांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनी अजूनही बिल भरण्याबाबत विनंती करण्याच्या मूडमध्ये आहे. थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची त्यांची तयारी आहे. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने याबाबत थोडे सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी, महावितरणने या थकबाकीदारांना वीज बिल तातडीने भरून महावितरणसमोर निर्माण झालेली आर्थिक अडचण दूर करण्याची विनंती केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मार्च २०२०पासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादूर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. एप्रिल२०२० ते जानेवारी २०२१या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. राज्यातील ४१ लाख ७हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२हजार ग्राहकांनी एप्रिल २०ते जानेवारी २१ या सलग दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ५९ हजार ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ३३ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये करोडो रुपयांची भर पडली असून महावितरणला मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे. महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी आपल्या थकीत वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजबिलांच्या एकूण ९,८०,४९९ पैकी ९,३३,३२४ तक्रारीचे निवारण महावितरणने केले आहे. उर्वरित तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील वीजबिलांच्या केवळ ४७ हजार तक्रारी वगळता उर्वरित सर्व तक्रारींचे महावितरणकडून निवारण करण्यात आले आहे. याशिवाय वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात ३२०१ वेबिनार, ५६७९ मेळावे घेण्यात आले होते. तसेच १५५२४ मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी १७४२ मदत कक्ष अद्यापही सुरु आहे, असेही महावितरणद्वारे सांगण्यात आले.

नवी योजनाही सुरू
महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. उच्चदाब वीजग्राहकांना मंडल कार्यालय, २० किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि २० किलोवॅटपर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येईल, असे महावितरणद्वारे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post