युद्धाच्या 'त्या' दोन्ही फ्रंटवर भारत सक्षम : कमांडंट झा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''सामरिक व रणनैतिक अशा युद्धाच्या दोन्ही फ्रंटवर भारत सक्षम आहे,'' असा विश्वास नगरच्या एसीसी अॅड एस लष्करी आस्थापनेचे कमांडंट जनरल शैलजानंदन झा (व्हीएसएम) यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. ''१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात व बांगला देश निर्मितीच्यावेळी भारतीय लष्कराने एकाचवेळी पूर्व व पश्चिम पाकिस्तान सीमेवर म्हणजे या दोन्ही फ्रंटवर लष्करी शौर्याचे अतुलनीय प्रदर्शन करताना तिसरा फ्रंट म्हणजेच रणनैतिक स्तरावरही प्रभावी काम केले. त्यावेळी अमेरिका व चीन हे दोन्ही देश पाकिस्तानच्या बाजूने या युद्धात हस्तक्षेपाच्या तयारीत असताना त्यांनाही रोखण्यात व त्यापासून परावृत्त करण्यात भारताला यश आले होते,'' असेही झा यांनी आवर्जून सांगितले.

भारत-पाकिस्तानमधील १९७१च्या युद्धाला ५० वर्षे झाल्याने स्वर्णीम विजय वर्ष उपक्रम वर्षभर भारतीय लष्कराद्वारे साजरे केले जात आहे. याअंतर्गत दिल्लीतून निघालेली मशाल ज्योत नागपूरमार्गे नगरला 'एमआयआरसी'मध्ये आली आहे. येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत ती येथे राहणार आहे. यानिमित्त 'एमआयआरसी'मधील डिसुझा ओपन थिएटरमध्ये त्या युद्धात सहभागी झालेले अधिकारी व जवान तसेच शहीद झालेल्या अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांचा व वीर नारींचा सन्मान झा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी 'एमआयआरसी'चे कमांडंट ब्रिगेडियर विजयसिंग राणा, अंजना झा, निवृत्त मेजर जनरल बी. एस. मलिक, निवृत्त ब्रिगेडियर आर. एस. रावत, लेफ्टनंट कर्नल अनंत गोखले, बांगला देश नॅशनल आर्मीचे कॅप्टन एहसान तसेच नगरचे सिव्हील सर्जन डॉ. सुनील पोखरणा आदींसह चारशेवर सैनिक कुटुंबिय व जवान उपस्थित होते.

कमांडंट झा पुढे म्हणाले, ''पश्चिम पाकिस्तानद्वारे होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला विरोध पूर्व पाकिस्तानमध्ये बांगला देश मुक्ति वाहिनी करीत होती. त्यांना त्या कामात भारतीय लष्कराने मदत केली. त्यामुळे ३ डिसेंबर १९७१ला ऑपरेशन चंगेझखानअंतर्गत पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले केले, त्यांना ४ डिसेंबरपासून भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देणे सुरू केले. १६ डिसेंबरला हे युद्ध थांबले तेव्हा पाकिस्तानच्या ९३ हजारावर सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते व ते भारतीय लष्कराच्या ताब्यात होते आणि पाकिस्तानने भारतापुढे शरणागती पत्करली होती. या युद्धात भारतीय लष्कर एकाचवेळी पश्चिम पाकिस्तान सीमेवर व पूर्व पाकिस्तान सीमेवर लढत होते व त्याचवेळी अमेरिकन नाविक दल पाकिस्तानसाठी भारताच्या दिशेने निघाले होते व दुसरीकडे चीनही पाकिस्तानची बाजू घेऊन भारताला धमक्या देत होते. पण या युद्धात त्यांनी आपल्यासमोर अडचणी निर्माण करू नये म्हणून भारताने रणनैतिक कौशल्याद्वारे त्यांना रोखले व दुसरीकडे पूर्व-पश्चिम पाकिस्तानच्या सीमेवर अतुलनीय शौर्य गाजवत पाकिस्तानचा पराभव केला. अशा पद्धतीने एकाचवेळी तीन फ्रंटवर शौर्य गाजवत विजय मिळवण्याची सक्षमता ५० वर्षांपूर्वीच भारतीय लष्कराने दाखवली आहे व त्याचा भारतीय लष्कराला अभिमान आहे,'' असे सांगून ते म्हणाले, ''१९६२च्या चीनविरुद्धच्या पराभवानंतर अवघ्या ९ वर्षात भारतीय लष्कराने सक्षमता मिळवल्याचे १९७१मध्ये पाकिस्तानचा पराभव करून व बांगला देशाची निर्मिती करून दाखवून दिले,'' असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी ब्रिगेडियर रावत, मेजर जनरल मलिक, कर्नल गोखले यांनी १९७१च्या त्या युद्धाच्या आठवणी जागवल्या. बांगला देश लष्कराचे कॅप्टन अहसान यांनी यावेळी बोलताना, १९७१मध्ये बांगला देश मुक्तीसंग्रामाला भारतीय लष्कराने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी 'एमआयआरसी'च्या सैनिकी बँडने तसेच पाईप बँडने विविध देशभक्तीपर गीते सादर केली. युद्ध दिग्गज व वीर नारी मिळून चारशेवर जणांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणही झाले.

Post a Comment

Previous Post Next Post