महिना झाला.. आश्वासनपूर्ती नाही; मनसे करणार जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आंदोलन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे खासगी हॉस्पिटलला पाठीशी घालत असल्यामुळे त्यांच्याविरोधात ५ मार्च रोजी मनसे आंदोलन करणार आहे व रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार व जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आश्वासन देऊन १ महिना उलटला तरी कोरोना रुग्णांना पैसे परत मिळाले नाही, असा दावाही भुतारे यांनी केला आहे.

कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्यांकडून खासगी हॉस्पिटल्सने घेतलेल्या वाढीव रकमेच्या बिलांची शासन नियमांप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व त्यांच्या समितीमार्फत तपासणअंती वसूलपात्र रक्कम खासगी हॉस्पिटलवाले कोरोना रुग्णांना देत नसल्यामुळे मनसेच्यावतीने आंदोलने झाली. शरद पवार साहेबांच्या दौऱ्यात मनसे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना फ्लेक्स फलक दाखविण्यात येणार होते, परंतु जिल्हाधिकारी व मनसे तसेच पोलीस अधीक्षक यांच्यामध्ये बैठक होऊन एक महिन्याच्या आत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांच्या वाढीव बिलांची रक्कम आम्ही परत मिळवुन देऊ, असा शब्द दिला होता. परंतु तो पाळताना जिल्हाधिकारीसाहेब दिसत नसून महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्याप्रमाणेच उलट त्या लुटमार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत, असा दावा भुतारे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे पक्षाचे अध्यक्ष तसेच महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक खासदार शरद पवार यांना देखील यासंबंधी निवेदन दिले व त्यांनी सुध्दा यासंबंधी आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी देखील दिलेला शब्द पाळताना दिसत नसल्यामुळे त्यांनीसुध्दा जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणे अहमदनगरमधील गोरगरीब जनतेचा विश्वासघात केला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांची वाढीव बिलांची वसूल पात्र रक्कम त्या-त्या रुग्णांना संपुर्ण महाराष्ट्रात परत मिळते. मग अहमदनगर जिल्ह्यातच ही वाढीव बिलांची रक्कम परत का मिळत नाही, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व जनतेचा सवाल आहे. त्यातच पुन्हा कोरोना रुग्ण वाढत चालले असून सरकारी यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यात सक्षम नसल्यामुळे पुन्हा सर्वसामान्य जनतेला खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयांचे बिले भरावे लागणार असल्यामुळे मागच्या सारखी खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांची लुटमार होऊ नये म्हणुन तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनी कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव बिलांची रक्कम परत खासगी हॉस्पिटलकडून परत मिळवून दिली नसल्यामुळे मनसे ५ मार्चसा कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव बिलांची रक्कम परत मिळण्याकरिता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मनसेने नितीन भूतारे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. या वेळी मनसेने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. अनिता दिघे, तसेच रस्ते आस्थापनाचे जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसे उपशहराध्यक्ष व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भुतारे यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post