'त्या' गाड्या दुरुस्त होतात फक्त पाथर्डीतच.. युवकाने मिळवले अभिनव कौशल्य


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

इलेक्ट्रीक बॅटरीवर चालणारी कोणतीही गाडी बिघडली तरी आता तिच्या दुरुस्तीची चिंता करण्याचे काहीच कारण राहिलेले नाही. पाथर्डीसारख्या अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात श्रीकांत शिंदे या युवकाने इलेक्ट्रीक गाड्यांच्या दुरुस्तीच्या अभिनव कौशल्याच्या बळावर पाथर्डीला जगाच्या नकाशावर नेले आहे. हे आगळेवेगळे व अचूक कार्य पाहून अमेरिकेतील विद्यापीठाने अवघ्या बारावी शिकलेल्या उद्योजक श्रीकांत शिंदे यांना मानद डॉक्टरेट पदवीने गौरविले आहे.

बॅटरीवर चालणारी गाडी कुठेही खरेदी केली तरी ती दुरुस्त कशी करायची याचे देशपातळीवरील प्रशिक्षण मात्र पाथर्डी तालुक्यात येऊनच आता घ्यावे लागणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहन संशोधन व विकास केंद्राच्या माध्यमातून देशाच्या विविध भागातील व्यावसायिकांना पाथर्डी तालुक्यातील भोसे येथील कारखान्यात येऊनच माहिती घ्यावी लागणार आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील दुष्काळी पट्ट्यात करंजीपासून सहा किलोमीटर अंतरावर भोसे शिवारात गो गो मोटर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून येथील श्रीकांत पोपटराव शिंदे या तरुणाने तालुक्यात पहिलाच उद्योग स्थापन केला. गो गो एवन डॉट.कॉम व्यापार चिन्हातून त्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची डिझाईन तयार करणे, त्यासाठीच्या सुट्या भागांची जोडणी करीत जुन्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी गाड्यांना सुद्धा रचनेत बदल करून बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये रुपांतर करण्याचा उद्योग सुरू केला.सुमारे दहा वर्षापूर्वी शिंदे यांनी चीनमध्ये अशा कंपनीत नोकरी केली. तेथून जुजबी ज्ञान मिळवत मुंबई येथे व्यवसाय सुरू केला. परिस्थितीशी अत्यंत कठीण संघर्ष करीत व्यवसायाला आकार देण्याचा प्रयत्न केला. कोरोना साथीत व्यावसायिक व औद्योगिक मंदीचे परिणाम भोगावे लागल्याने शिंदे यांनी गावाकडे उद्योग उभारून मुंबई येथे कॉर्पारेट ऑफिस ठेवण्याचा निर्णय घेतला. गावाकडे येऊन गावाकडील मुलांना रोजगार उपलब्ध होऊन पहिल्या टप्प्यात सुमारे 20 स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला. चार्जिंग स्टेशन, पॅकिंग बॉक्स, विविध प्रकारचे सुटे भाग उत्पादन व वाहतूक, मार्केटिंग, प्रशिक्षण आदी क्षेत्रात तालुक्यात रोजगार वाढविण्याचे त्यांचे नियोजन आहे.

विद्यापीठांनी केला गौरव
या उपक्रमाचे भविष्यकालीन महत्त्व व गरज पाहून सिंम्बॉयसिंस व रायसोनी विद्यापीठांनी या उद्योगाशी करार केला असून, या संस्थेमध्ये आता बॅटरीवरील वाहन दुरुस्ती व तंत्रज्ञानाबाबत प्रमाणपत्र, अभ्यासक्रम घेता येणार आहे. शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी याच नावाने संस्था नोंदणी चीनमध्ये केली. काही काळ तिथे उत्पादन सुरू केले. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेत इतर राष्ट्रांकडूनही अशा वाहनांच्या आराखड्याबाबत व तांत्रिक उपलब्धतेबाबत विचारणा सुरु झाली आहे. आधुनिक व्यापाराचे अनेक पर्याय कंपनीकडून अंमलात आणले जात आहेत. सध्या सायकलवर्गीय व तीन चाकी वाहनाचे डिझाईन तयार करून फॅब्रिकेशनची कामे अन्य व्यावसायिकांकडून केली जातात. जुळणी करणे, पेटंट घेणे, उत्पादकांना वितरक मिळवून देणे अशी कामे सुद्धा कंपनीकडून केली जातात. मालाचा दर्जा व तांत्रिक परिपूर्णता पाहून दुबईमधून विक्रेत्यांनी मागणी नोंदवली आहे. कंपनीने आरामदायी बैठकीसह अॅक्टिवासारखे तयार केलेले मॉडेल हैदराबाद येथील उत्पादक कंपनीने स्वीकारले आहे. कोरोनाने सर्वस्व गेले म्हणत निराश होण्यापेक्षा ती एक संधी समजून युवकाने गावात औद्योगिक नगरीचे रुप देण्याचा ध्यास मनात घेऊन हाती घेतलेला उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

कंपनीचे चार चाकी वाहन विकसित होणार
याविषयी माहिती देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, चारचाकी वाहन उत्पादनाचा कंपनीचा मानस आहे. येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. सध्या आम्ही प्रतितास 120 किलोमीटर वेगाने धावणारी मोटरसायकल तयार केली आहे. अडचणीवर मात करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल टॉवर उभारला. शासनाने पंधरा वर्षांहून जुनी वाहने रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी अशी वाहने बॅटरीवर चालवली जाऊ शकतात. देशाचे सर्वाधिक परकीय चलन इंधनावर खर्च होते. इलेक्ट्रीक वाहनांचा प्रचार व वापर जेवढा वाढेल, तेवढी इंधन बचत होणार आहे. तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे देशभर दळणवळण सुलभ ठरणार आहे. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादकांचा दबाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे देशात वाहन विक्रीची उपलब्ध यंत्रणा सहकार्य करीत नसल्याने अशा विक्रेत्यांचे देशभर जाळे म्हणून त्यांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. या कामात कुटुंबियां बरोबरच भाऊ सचिन, चुलते भरत यांचेसुद्धा मोठे योगदान आहे. दुष्काळी तालुक्याला आपला उद्योग दिलासा देणारा ठरून जेवढी कल्पनाशक्ती लढवू, तेवढा उद्योगाचा विस्तार होऊ शकेल. पण, सर्व काही आम्ही करू शकत नाही, त्यामुळे अनेकांनी यासाठी पुढे यावे, हीच अपेक्षा असल्याचे शिंदे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post