व्हिडीओ कॉलवर 'नवीन' दिसला आणि त्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू.. अमरावतीच्या अपहृत बालकाची अहमदनगर पोलिसांनी केली सुटका

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

घरात काम करणाऱ्या ओळखीच्या महिलेने त्याला अपहृत केले होते. पण त्यापासून तो अनभिज्ञ होता. खाऊ-बिस्किटे मजेत खात होता. पोलीस दादांनी व्हिडीओ कॉल करून त्याच्या आजीला व नातेवाईकांना त्याचे हे रूप दाखवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलेच, समवेत डोळ्यात आंनदाश्रूही तरळले. अमरावतीच्या नवीन लुनिया या चार वर्षाच्या बालकाची ही कथा.. दोन दिवसांपूर्वी अमरावतीहून त्याला पळवून आणले होते व कल्याणला नेऊन त्याच्या नातेवाईकाकडून खडणी उकळण्याचा अपहरणकर्त्यांचा इरादा होता. पण अमरावती पोलिसांची सजगता व अहमदनगर पोलिसांची धाडसी शोध मोहीम फत्ते झाली व नवीनची सुखरूप सुटका होताना त्याला पळवणारे 5 जणही जेरबंद झाले. अहमदनगर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल अमरावतीच्या लुनिया परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी या घटनेची व तपास कार्याची माहिती दिली. अमरावती येथील चार वर्षाच्या बालकाचे नवीन लुनिया याचे अपहरण केल्याची घटना दिनांक 17 फेब्रुवारी रोजी घडल्यानंतर अपहरण करणारे आरोपी अहमदनगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या चार वर्षाच्या मुलाची अहमदनगरमध्ये सुखरूप सुटका केली. या घटनेप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांना अमरावती पोलिसांच्या हवाली केले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नेमके कोणत्या कारण्यासाठी हे अपहरण केले, याचा पोलिस शोध घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बालकाच्या नातेवाईकांपैकी कोणी तरी या अपहरणाचा कट रचल्याचे समजते. आता अमरावतीचे पोलीस त्याचा छडा लावणार आहेत. अहमदनगर पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये हिना शाकीर शेख उर्फ हिना अनिकेत देशपांडे (वय वर्ष 25, राहणार कोठला, अहमदनगर), असलम ताहीर शेख (वय 18, राहणार कोठला, अहमदनगर), मुसाहिब नासिर शेख (वय 21, राहणार मुकुंदनगर, अहमदनगर), आसिफ हिनायत शेख (वय 24, राहणार कोठला, अहमदनगर), फैरोज रशीद शेख (वय 25, राहणार कोठला, अहमदनगर) यांचा यामध्ये समावेश आहे.

माहिती अशी की, मोनिका लुनिया (राहणार अमरावती) यांचा नातू नवीन (वय 4) याला फिरायला घेऊन गेले असता, एका मोटरसायकलवरून आलेल्या एका अनोळखी महिला व पुरुष यांनी नवीन यास पळून नेले. याबाबत अमरावती पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची माहिती अमरावती पोलिसानी अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिल्यानंतर अधीक्षक पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तात्काळ तीन वेगवेगळी पथके अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पाठवलेली होती. एका बातमीदाराकडून सदरचा गुन्हा हिना शेख व मुसाहिब शेख यांनी मिळून केला असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यादृष्टीने तपास सुरू केला. या प्रकरणांमध्ये हिना शेख, असलम शेख व मुसाहिर शेख यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. चौकशीमध्ये अपहरण केलेला मुलगा आसिफ शेख व फैरोज शेख यांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार पथकाने नगर शहर व परिसरामध्ये त्याचा शोध घेतला. नगर कल्याण रोडवरून ते बाळजाला घेऊन कल्याणच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी पथक गेले. एका मोटारसायकलवरून अपहरण झालेल्या मुलास घेऊन कल्याणच्या दिशेने जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मुलास ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गणेश इंगळे, मन्सूर सय्यद, दत्तात्रय इंगळे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, भाग्यश्री भीटे, सोनाली साठे, विजय धनेधर, रोहित येमुल, सागर ससाने, योगेश सातपुते, जालिंदर माने, मयुर गायकवाड, कमलेश पाथरूट, बबन बेरड, शरद बुधवंत तसेच अमरावती शहर पोलीस ठाण्याचे कृष्णा मापारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली आहे. येथे पकडलेल्या आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या आरोपींना अमरावती पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, ते पथक अमरावती कडे रवाना झाले आहे.

तो होता आनंदात
अपहरण केलेल्या चार वर्षीय मुलाला पोलीस मुख्यालयामध्ये पोलिसांनी आणले असता, तो अतिशय आनंदामध्ये दिसला. पोलिसांनी त्याला कॅडबरी व बिस्किटाचे पुडे दिल्यानंतर त्याचा आनंद अधिक द्विगुणित झाला. त्याने जोरदारपणे थँक्यू म्हणून एक प्रकारे आभारच मानले. तो एक चर्चेचा विषय ठरला.

डोळ्यात आले अश्रू
अपहरण झालेला मुलगा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर, त्याच्या अमरावती येथील नातेवाइकांनी नगरच्या पोलिसांचे विशेष आभार मानले. त्या मुलाला व्हिडिओ कॉलिंग द्वारे बघितल्यावर त्यांच्या नातेवाइकांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू यावेळी पाहायला मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post