'या' केंद्रीय मंत्र्यांच्या दालनात देणार ठिय्या.. 'रेलरोको'चाही इशारा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सुरू झाली नाही तर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय येथील जागरूक नागरिक मंचासह विविध स्वयंसेवी संघटनांनी घेतला आहे. त्याआधी रेल्वे प्रशासनाला या शटल रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत निवेदने देऊन पुरेसा वेळ दिला जाणार आहे व रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावाही केला जाणार आहे. त्यातूनही ही सेवा सुरू होण्याची चिन्हे दिसली नाही तर रेल रोको आंदोलनाचीही तयारी ठेवली गेली आहे.

जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्यासह हरजितसिंग वधवा, ॲड. कारभारी गवळी, आर्किटेक्ट अर्शद शेख यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-पुणे शटल सर्व्हिसबाबत रेल्वे स्टेशनवर जाऊन स्टेशन प्रबंधक प्रभारी परेरा, मीना तसेच बावीस्कर या अधिकाऱ्यांना सुमारे पन्नास जणांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवेदन दिले. यावेळी या शिष्टमंडळाने असा इशारा दिला की, आजपासून एक महिन्याची मुदत रेल्वे प्रशासनाला देण्यात येत आहे. या काळात या शटल सर्व्हिसबाबत सकारात्मक विचार झाला नाही तर 13 मार्च-शनिवार रोजी गांधीगिरी करून शांततेच्या मार्गाने रेल रोको आंदोलन समस्त नगरकरांना बरोबर घेऊन करण्यात येईल, असे स्पष्ट केले गेले.

याबाबत माहिती देताना मुळे यांनी सांगितले की, नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय बजेटमध्ये महाराष्ट्रातील सर्वार्थाने सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरच्या पदरात फुटकी कवडीही पडलेली नाही. रेल्वेने नेहमीच अहमदनगरला सावत्र वागणूक दिली आहे, आजपर्यंत शेकडो निवेदन देऊनही स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सोलापूर मंडल रेल्वे महाप्रबंधक आणि रेल्वेमंत्री हे कशाचीही दखल घेताना दिसत नसून निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे आता निवेदने देणे बंद करून प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करीत असून त्यायोगे रेल्वे प्रशासनाला हा इशारा देण्यात येत आहे की, येत्या आठवड्यात सोलापूर मंडल रेल्वे महाप्रबंधक यांची भेट घेऊन या संदर्भात पहिली पायरी म्हणून निर्वाणीचा इशारा देणार आहोत आणि त्यानंतर थेट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या दालनामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती सुहास मुळे यांनी दिली. सर्व संघटनांकडूनदेखील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या शिष्टमंडळात दत्ताशेठ गायकवाड, अमृतशेठ बोरा, जय मुनोत, सचिव कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, धनेश बोगावत, जालिंदर बोरुडे, रमेशचंद्र बाफना, मकरंद घोडके, प्रसाद कुकडे आदींचा समावेश होता. रेल्वे विभागाने दौंड येथे 30 कोटी रुपये खर्च करुन कॉड लाईनचे काम पुर्ण केले. कॉड लाईनचे काम झाल्याने नगरहून पुण्याकडे जाणारी शटल रेल्वे दौंड स्टेशनवर इंजिन बदलण्यासाठी न थांबता दोन तासात पुण्याला पोहोचणार आहे. ही रेल्वेसेवा नगरकरांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी संघटनांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेसह पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, जागरूक नागरिक मंच, हरदिन मॉर्निंग ग्रुप, पीस फाऊंडेशन, फिनिक्स सोशल फाऊंडेशन अशा विविध संघटनांना आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post