जरे हत्याकांड : बोठेच्या शोधाशोधीत पोलिसही शिकले बरेच काही..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला आता अडीच महिने होत आले आहेत व अजूनही या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळ ज. बोठे पोलिसांना सापड़ू शकलेला नाही. पण त्याच्या या शोधाशोधीच्या कामामुळे पोलिसांनाही नव्या तंत्रज्ञानाबाबत बरेच काही शिकायला मिळाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार स्वतःचा साधा क्लूही पोलिसांना कसा लागू देत नाही, पोलिसांकडून पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या गुन्ह्याच्या तपासात नव्या तंत्रज्ञानामुळे येणारे अडथळे व ते दूर करण्यासाठी पोलिसांनाही घ्यावा लागलेला नव्या तंत्रज्ञानाचा आधार.. असे बरेचकाही धडे पोलिसांना बोठेच्या शोधाशोधीतून मिळाले आहे. 

पोलिसांची पारंपरिक तपास पद्धतही आता नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक अपडेट करण्याची गरजही यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आता या बाबींवर विचारमंथन सुरू केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या स्टँडींग वॉरंटला बोठेने आव्हान दिले असल्याने व त्याची सुनावणी येत्या १८ रोजी जिल्हा न्यायालयात होणार असल्याने त्यात काय होते, हे पाहून पोलिस तपासाची पुढची दिशा ठरवणार असल्याचे समजते.

रेखा जरे यांची हत्या मागील ३० नोव्हेंबर २०२० रोजी नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात घडली आहे. या घटनेला आता अडीच महिने पूर्ण होत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपी अटक केले असले तरी या खुनाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही व तो सापडल्याशिवाय जरे यांच्या हत्येचे कारणही स्पष्ट होणार नाही. या पार्श्वभूमीवर, बोठेचा लागत नसलेला शोध हे जिल्हा पोलिसांचे अपयश दिसत असले तरी पोलिसांना मात्र तो नक्कीच जेरबंद होईल, याची खात्री आहे. पण त्याआशेवर पोलिस थांबलेले नाहीत. तर बोठेविरुद्धची अन्य तपास प्रक्रिया त्यांनी गतिमान केली आहे. एखादा गुन्हेगार देश सोडून जाऊ नये म्हणून त्याच्या विरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करणे तसेच राज्य व देशातील पोलिसांची आरोपीच्या शोधासाठी मदत मिळावी म्हणून न्यायालयाद्वारे त्याच्याविरोधात स्टँडींग वॉरंट घेण्याची प्रक्रिया नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच जरे हत्याकांड तपासात घडली आहे.

गुन्ह्याच्या तपासासाठी कायद्यातील अशा विशेष तरतुदींचा अवलंबही जिल्ह्यात पहिल्यांदाच झाला आहे. शिवाय पोलिसांनी कॉल रेकॉर्डस, सीसीटीव्ही फुटेज व अन्य अनुषंगिक भक्कम पुरावे गोळा केले असल्याने जिल्हा न्यायालयात व औरंगाबाद खंडपीठातही बोठेचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले गेले आहेत. पोलिसांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू असल्या तरी बोठेचा प्रत्यक्ष शोध अजूनही का लागू शकत नाही, हा अनुत्तरीत प्रश्न मात्र कायम आहे. या पार्श्वभूमीवर, आता त्याने पारनेर न्यायालयाने दिलेल्या स्टँडींग वॉरंट आदेशाला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले असल्याने त्याच्या सुनावणीनंतर पोलिसांची तपासाची पुढची दिशा निश्चित होणार आहे. तो सापडत नसल्याने त्याला फरार घोषीत करणे, तसेच त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यासह त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करणारांवर करावयाची कारवाई यादृष्टीने आवश्यक प्रक्रियेचे काम पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते. दरम्यान, जरे हत्याकांडाच्या गाजलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही सापडत नसल्याने नागरिकांच्या विस्मरणात हा विषय जाण्याच्या मार्गावर दिसू लागला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post