रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पवारही घालणार लक्ष


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला दोन महिने होत आले तरी त्यांच्या खुनाची सुपारी देणारा पत्रकार बाळ ज. बोठे सापडत नाही व तो सापडत नसल्याने या खुनाच्या कारणाचे स्पष्टीकरणही अजून गुलदस्त्यात असल्याने या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता या प्रकरणात लक्ष घालण्याचे सुतोवाच केले आहे. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने नुकतीच पवार यांची नगर दौऱ्याच्यावेळी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी त्याला दिलासा दिला आणि जरे खून प्रकरणांमध्ये आपण स्वतःहून लक्ष घातलेले आहे व राज्याच्या गृहमंत्र्यांशी सुद्धा यासंदर्भात बोलणे झाले आहे. तरीही, मी यात परत लक्ष घालतो, अशी ग्वाही दिली.

त्याला शासकीय वरदहस्त आहे?
यावेळी जरे कुटुंबाने पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. पण, अद्याप पर्यंत गुन्हा घडल्यापासून बोठे हा चतुर व बुद्धीचा वापर करून फरार आहे. तो अद्यापपर्यंत अटक झालेला नाही. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना माहीत नाही. त्यामुळे चौकशी रेंगाळत आहे. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असताना त्याला पकडणे महत्त्वाचे आहे. त्याचा पूर्वीचा इतिहास पाहिला असता तो थक्क करणारा आहे. त्याच्या इतिहासाचे दाखले आता गुन्ह्यांच्या स्वरुपात लोकांसमोर येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तसेच मोठ्या वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक असल्याने त्याला शासकीय वरदहस्त आहे आहे का? यात पोलीस अधिकारी आहे का? असे अनेक प्रश्न चर्चिले गेले आहे. यात त्याला कोणी मदत करत आहे का?, असाही संशय आहे. मात्र, यापैकी कुठल्या प्रश्नाला दुर्दैवाने आतापर्यंत उत्तरे मिळू शकले नाही, असा खंत या निवेदनात व्यक्त करून पुढे म्हटले आहे की, याचा अर्थ असा की त्याने सारे काही स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणामध्ये तो गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत आहे का? यावर संशय निर्माण झाला आहे. बोठे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे अर्ज करू शकतो. तरीदेखील तो मिळून आला नाही. त्यामुळे संपूर्ण तपासावर शंका उपस्थित होणारी आहे. त्यामुळे बोठे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, असे आदेश देण्यात यावे तसेच त्याला पकडण्यात जिल्ह्यातील पोलीस कमी पडत नाही ना? असा सर्वसामान्यांना प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी पोलिसांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तरी बोठे त्यांना मिळत नाही, यावर देखील प्रश्न निर्माण होत आहे. तसेच बोठेचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यातील रेकॉर्ड हे महत्वाचे आहे, असे नमूद करून पुढे म्हटले आहे की, पोलिसांनी फिर्यादीला पोलिस संरक्षण दिले असले तरी पोलीस संरक्षण घेऊन किती दिवस जगणार असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. त्यामुळे त्याला तातडीने अटक करण्याचे आदेश देण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post