जरे हत्याकांड : 'त्या' आरोपींना 'व्हीआयपी' ट्रीटमेंट? रुणाल जरे यांचा दावा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या आरोपींना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देऊन चौकशीची व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

या निवेदनात रुणाल जरे यांनी म्हटले आहे की, पारनेर पोलीस स्टेशन मधील गु.र.नं.४७८/२०२० मधील (रेखा जरे खून प्रकरण) इतर आरोपी यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याबाबत खात्रीलायक लोकांकडून माहिती मिळाली असल्याने त्याची योग्य ती चौकशी व्हावी व सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी व्हावी, दोषी लोकांवर कारवाई करण्यात यावी, असे यात म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पारनेर पोलीस स्टेशनमधील गु.र.क्र. ४७८/२०२० मधील इतर अटक आरोपी यांना त्यांचे नातेवाईकांमार्फत व संबंधित पोलिसांमार्फत व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झालेली आहे. सदर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यावेळी संबंधित आरोपी यांचे नातेवाईक व हितचिंतक यांच्याकडून पोलिसांच्या मदतीने त्यांचे भेटीगाठी होत असताना त्यांना इतर आरोपीप्रमाणे न वागवता व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे समजते व कळले आहे. त्यामुळे सदर सर्व आरोपी यांना पारनेर येथील न्यायालयीन कोठडीत न ठेवता त्यांना नगर येथील कारागृह अथवा नाशिक कारागृहात वर्ग करण्यात यावे. तसेच गुन्हयाचे स्वरुप पाहता सदरचा प्रकार अतिशय गंभीर स्वरुपाचा असुन सदरची घडत असलेली घटनादेखील गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे त्याची चौकशी होणे महत्वाचे आहे. तसेच या आरोपींना मदत करणारे पोलीस व नातेवाईक यांना चौकशीकामी बोलवणे महत्वाचे आहे. त्यामुळे संबंधित दोषी लोकांवर योग्य ती कारवाई व्हावी तसेच आरोपी यांना नगर, पुणे व नाशिक येथील कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post