रेखा जरे हत्याकांड : बोठेला पकडण्याची हमीच पोलिसांनी दिली नाही!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अद्यापपर्यंत पोलीस अधीक्षक व तपासी अधिकारी यांना वेळोवेळी भेटून जरे हत्याकांड तपासाबाबत विचारपूस केली असता, मला अद्यापपावेतो कोणीही जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पकडण्याची हमी दिली नाही. त्यामुळे मला यापुढे कोणताही मार्ग सापडत नाही, अशी उद्वेगजनक खंत यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष (स्व.) रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी व्यक्त केली आहे. बोठेला तातडीने पकडण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करायचे असल्याने पोलिसांनी त्यासाठी परवानगी द्यावी, असे पत्रही रुणाल जरे यांनी याच उद्वेगातून पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ मंगळवारी नगर शहरात येणार असल्याने रुणाल जरे यांनी दिलेल्या उपोषण इशाऱ्यासंदर्भात त्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे.

अडीच महिने उलटून गेले तरीही सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठेचा शोध लागायला तयार नाही. आरोपीला अटक होत नसल्यामुळे आता जरे यांचा मुलगा रुणाल जरे याच्या सहनशीलतेचा अंत झाल्याचे चित्र असून त्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्रही रुणाल जरे याने सोमवारी जिल्हा प्रशासनाला व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवेदनाची प्रत रुणाल जरे याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही पाठवली आहे. त्यामुळे तेही या निवेदनाची काय दखल घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, 'यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याला अद्यापपावेतो अटक झालेली नाही. गुन्हा घडल्यापासून मुख्य सुत्रधार हा फरार आहे. तसेच त्याचा ठावठिकाणा देखील पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करते? असा प्रश्न मला पडला आहे. पोलीस कुठे हतबल होत आहे का? तसेच एलसीबीचे सक्षम पोलीस अधिकारी एखाद्या सराईत गुन्हेगारास पकडण्यास सर्व पोलीस यंत्रणा कामास लावतात व त्यास पकडून हजर करतात. परंतु जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार व इतर गुन्हयातील मुख्य सुत्रधार हे वेगळे असतात का? असा प्रश्न उपस्थित होतो. मग, मला न्याय कसा मिळेल?, असा सवाल करून रुणाल जरे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर गुन्हा घडल्यापासून आजपावेतो मुख्य सुत्रधार बाळ बोठे सापडत नाही. ७५ दिवसाचा कालावधी होऊन गेला आहे. ९० दिवसांत या गुन्ह्याचे चार्जशीट न्यायालयात दाखल करण्याची तयारी देखील चालू झाली असेल. नगरचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार यांनादेखील याबाबत निवेदन दिले आहे. एवढे करुन देखील मुख्य सुत्रधार बोठे हा मिळून येत नाही. तसेच रोज न्युजपेपर, टीव्ही यात पाहतो की, सराईत गुन्हेगारांना पोलिस हे सर्व यंत्रणा कामाला लावून मोठ्या शिताफीने पकडतात. परंतु आमच्या केसमध्येच असे का घडते? मुख्य सुत्रधार हा हायकोर्ट, सेशन्स कोर्टमध्ये त्याच्या हितचिंतकामार्फत वकीलपत्रावर सह्या पाठवतो व प्रकरण दाखल होते तरीही पोलिसांना तो मिळत नाही. मुख्य सुत्रधाराची सर्व यंत्रणा काम करते, परंतु पोलिसांची सर्व यंत्रणा कमी का पडली? त्यामुळे पोलिस यंत्रणा सक्षम असताना देखील मुख्य सुत्रधार, पत्रकार, डॉक्टरेट एवढया पदव्या असणारे देखील लोक पोलिसांना सापडत नाही. याउलट, सामान्य आरोपी हा तात्काळ अटक होतो. त्यामुळे सीआयडी चौकशी करावी लागणार नाही ना? मुख्य सुत्रधार यास अटक होईल का? होईल तर कधी होईल? त्याच्यावर कडक कारवाई होईल का? असे प्रश्न मला व माझ्या कुटुंबीयांना व समाजातील सामान्य लोकांना पडला आहे. त्यामुळे मला उपोषण करण्यापलिकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्याशिवाय माझ्या आईला न्याय मिळणार नाही, असे मला वाटते. तरी विनंती की, मला व माझ्या कुटुंबियांसमवेत व हितचिंतकासोबत आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची परवानगी मिळावी ही नम्र विनंती,' असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान, मागील वर्षी 30 नोव्हेंबर २०२० ला रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचे नाव आले. मात्र, तेव्हापासून बोठे हा पसार आहे. गेल्या अडीच महिन्यापासून बोठे याचा शोध लागला नाही. त्यातच रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच उपोषणाला बसण्याचा इशारा देत एक निवेदनच पोलीस प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे पोलिसांची भूमिका आता महत्त्वाची झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post