पर्यटन विकासाला सरसावले पोलिस.. शिर्डीत राज्यातील पहिला अभिनव उपक्रम

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भाविकांच्या अडचणी समजून घेण्यात भाषेची अडचण येऊ नये म्हणून त्यांनी चक्क तेलगु, तमीळ, इंग्रजी, हिंदी, मराठी व गुजराथी भाषा शिकून घेतली आहे....उत्कृष्ट संभाषण कौशल्य अंगी रुजावे म्हणून विशेष प्रशिक्षणही घेतले...हे कमी म्हणून की काय भाविक-पर्यटकांना जिल्ह्यातील व जिल्ह्याजवळील धार्मिक-ऐतिहासिक, धाडसी तसेच सांस्कृतिक-विलोभनीय स्थळे नेमकी कोठे आहेत व त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, हे सांगण्यासाठीचा विशेष अभ्यासही केला आहे....शिर्डीतील १४० पोलिसांनी असे विशेष प्रशिक्षण घेतले आहे व तेही भाविक-पर्यटकांना सुरक्षा देण्यासह त्यांच्याद्वारे जिल्ह्याचा पर्यटन विकास व्हावा म्हणून. राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात शिर्डीत श्रीसाई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलिस मदत केंद्राच्या रुपाने झाली असून, नगर येथून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रिमोट कंट्रोलद्वारे शिर्डीतील या केंद्राचे उदघाटन मंगळवारी केले.

साईबाबांचे समाधीस्थळ असलेले शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ आहे. देशातील प्रत्येक राज्यासह जगभरातील ७० देशांचे भाविक-पर्यटक शिर्डीस येत असतात. जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना दरवर्षी अडीच ते तीन कोटी भाविक भेट देतात व त्यातील तब्बल अडीच कोटी भाविक फक्त शिर्डीमध्येच साईसमाधी दर्शनासाठी येतात. या भाविकांपैकी अनेकांची फसवणूक होते, किरकोळ साहित्य अव्वाच्या सव्वा किमतीत त्यांना विकले जाते, गर्दीत नातलग वा लहान मुलांची ताटातूट होते, मुले-महिला बेपत्ता होतात, पाकिटे-सोन्याचे दागिने चोरी होते, देशविदेशातील भाविकांना भाषेची अडचण असल्याने चुकीची माहिती दिली जाते व त्याचा त्यांना त्रास होतो व त्यांची फसवणूक होते...अशा सगळ्या प्रकारांतून त्यांच्या मनात पोलिस व शिर्डीसह महाराष्ट्र आणि देशाबद्दल प्रतिमा मलीन होते. अशा स्थितीत पोलिस टुरिझम या संकल्पनेतून शिर्डीतील श्रीसाईबाबा मंदिरालगत पर्यटन पोलिस मदत केंद्र करण्याची सूचना पोलिस महासंचालकांनी केली होती व अवघ्या दीड महिन्यात नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ती प्रत्यक्षात उतरवली आहे. आपल्या सुरक्षेसाठी....आपल्या मदतीसाठी....असे ब्रीदवाक्य घेऊन शिर्डीत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा व सुविधांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे श्रीसाई तीर्थक्षेत्र (पर्यटन) पोलिस मदत केंद्र आता कार्यरत झाले आहे. शिर्डीत सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत हे केंद्र सुरू राहणार आहे. भाविकांना शिर्डीत येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासह शिर्डीबाहेरील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती देऊन तिकडे जायचे असेल तर त्याचे मार्गदर्शनही करणार आहेत.

पर्यटन स्थळांची माहिती व वाहन सुविधाही

शिर्डीतील या अभिनव पर्यटन केंद्रात जिल्ह्यातील भंडारदरा धरण व निसर्गरम्य ठिकाण, हरिश्चंद्र गड, अकोले-संगमनेर तालुक्यातील शिवकालिन किल्ले, नगरचा भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, नगरचे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, जागतिक वारसा असलेले पारनेरचे रांजण खळगे, लवणस्तंभ, पांडवलेणी, टाकळी ढोकेश्वरचे मंदिर, नेवाशाचे मोहिनीराज मंदिर, पाथर्डीचे मोहटादेवी मंदिर, मढीचे कानिफनाथ मंदिर, तेथून जवळच असलेल्या मायंबा येथील मच्छिंद्रनाथ समाधी, वृद्धेश्वर, खर्डा किल्ला, श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील ऐतिहासिक गुरुद्वारा, कोपरगावचे शुक्राचार्य मंदिर...एवढेच नव्हे तर जगाला लोकसहभागातून गाव विकासाचा आदर्श घालून देणारी व्यक्तिमत्त्वे म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व त्यांचे गाव राळेगण सिद्धी तसेच पोपटराव पवार व त्यांचे गाव हिवरेबाजार, अशा अनेकविध धार्मिक-सामाजिक-ऐतिहासिक पर्यटन स्थळांची माहिती या केंद्राद्वारे भाविकांना दिली जाणार आहे. याशिवाय नगर जिल्ह्याबाहेरील म्हणजे शिर्डीपासून १०० ते १२५ किलोमीटर अंतरावरील नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी तसेच औरंगाबाद, वेरुळ-घृष्णेश्वर-भद्रा मारुती, अजिंठा अशा स्थळांची माहितीही दिली जाणार आहे. या मदत केंद्राद्वारे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) राज्यभरात असलेल्या हॉटेलचे बुकींगही करण्याची सुविधा तसेच आरटीओच्या मदतीने शिर्डीतील नोंदणीकृत प्रवासी वाहनांचे भाडेदर ठरवून देऊन भाविकांना शेअर कॅबचा पर्यायही उपलब्ध करवून दिला जाणार आहे. अमराठी भाविकांशी त्यांच्या भाषेतील संवादासाठी पोलिसांनी प्रशिक्षण घेतले आहेच, पण शिर्डीतील अशा दुभाषिक नागरिकांचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे. पर्यटकांना अशी एकीकडे माहिती दिली जात असताना त्यांची शिर्डीत कोणाकडून काही फसवणूक झाली, साहित्य चोरी झाली, मुले-महिला बेपत्ता झाल्या वा अन्य काही अडचण आल्यास शिर्डी पोलिसांच्या मदतीने त्याबाबतही आवश्यक सहकार्य केले जाणार आहे. शिर्डीतील विविध सेवा व त्यांची माहिती देणारी तसेच प्रमुख सेवांचे फोन नंबर असलेली पुस्तिकाही भाविकांना या केंद्राद्वारे दिली जाणार आहे. नगर शहर व जिल्ह्याचा पर्यटन विकास होण्याच्या व करण्याच्या घोषणा राजकीय नेते मंडळींकडून नेहमी होतात. पण प्रत्यक्ष कृती होत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मात्र पोलिस टुरिझम ही अभिनव संकल्पना फारसा गाजावाजा न करता प्रत्यक्षात आणली आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकारणी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाऱ्यांसाठी हा आगळावेगळा आदर्श मात्र ठरला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post