शिवजयंती : 'त्या' अजरामर चित्राच्या नातीने जागवल्या आठवणी..


 एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शासकीय कार्यालयांत वा शासकीय-निमशासकीय कार्यालयांच्या विविध कार्यक्रमांतून नेहमी भक्तीभावाने पूजन होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते अजरामर चित्र पुण्याचे दिवंगत ज्येष्ठ चित्रकार सखाराम शिंदे यांनी रेखाटले आहे. आजोबांचे हे चित्र आता सर्वत्र पूजनीय झाल्याचा अभिमान सखाराम शिंदे यांची नात संगमनेरच्या सुवर्णा मोरे यांनी बाळगत या चित्रासंदर्भातील आठवणीही शिवजयंतीनिमित्त जागवल्या आहेत.

पुणे येथील ज्येष्ठ चित्रकार सखाराम शिंदे यांनी ऐतिहासिक बखरी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या परदेशी चित्रकार व विचारवंतांनी महाराजांचे जे वर्णन केले आहे, त्यावरुन शिवाजी महाराजांचे अजरामर चित्र काढले आहे. राज्य शासनाकडून ते स्वीकारले जाऊन तेच आता बहुतांश शासकीय कार्यालयांत लावले गेले आहे तसेच शासकीय कार्यक्रमांतून याच चित्राचे पूजन होते. (स्व.) शिंदे यांच्या नात सुवर्णा मोरे या संगमनेर येथे राहतात व अशोक सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेत नोकरी करतात. शिवजयंतीनिमित्त आजोबांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राविषयीच्या आठवणी त्यांनी सोशल मिडियातून शेअर केल्यावर अनेक शिवप्रेमींनी त्यांचे अभिनंदन व कौतुकही केले.

एएमसी मीरर न्यूजपोर्टलद्वारेही त्यांच्याकडून आजोबांची माहिती घेतली गेली. त्यांना आजोबांविषयी माहिती आजी व वडिलांकडून मिळाली. चित्रकार शिंदेंचे मूळ गाव इंदापूर. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराशेजारी शिंदेंचा हॉटेल व्यवसाय होता. शिंदेंना चित्रकलेची आवड असल्याने ते अनेकविध चित्रे नेहमी रेखाटायचे. याच आवडीतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले. ऐतिहासिक बखरींमध्ये छत्रपतींचे असणारे वर्णन तसेच ब्रिटीशकालिन चित्रकार व विचारवंत तसेच अधिकाऱ्यांनी छत्रपतींना पाहिले असल्याने त्यांनी त्यांचे केलेले वर्णन (स्व.) शिंदेंनी अभ्यासले व मग छत्रपतींचे चित्र रेखाटले. ते इतके प्रभावी झाले की, स्वातंत्र्यानंतर शासनाने ते स्वीकारले व शासकीय कार्यालयांतून ते लावले गेले तसेच शासकीय कार्यक्रमांतून त्यांचे पूजनही केले जात आहे. (स्व.) शिंदे हे उत्कृष्ट नाट्य कलावंतही होते व प्रत्यक्ष बालगंधर्वांसमवेत त्यांनी नाटकांतून कामे केली आहेत. त्यांचे वडील अनंत शिंदे यांना पेशवेकाळात जहागिरी मिळाली होती. पुण्याच्या शनिवारवाड्याजवळील विठ्ठल मंदिर तसेच होळकर वाडाही मिळाला होता. पुढे हे सारे सरकारजमा झाले. पण त्या आठवणी पुढच्या पिढ्यांकडून जपल्या गेल्या आहेत. (स्व.) शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे काढलेले सुंदर चित्र कधी रेखाटले, याची माहिती त्यांची नात सुवर्णा मोरे यांना नाही. पण बहुदा स्वातंत्र्यानंतर ते त्यांनी रेखाटले असावे. (स्व.) शिंदे यांच्या चित्रकलागुणांची माहिती असल्याने स्वातंत्र्यानंतर नोटा व नाण्यांवरील डिझाईन बनवण्याचे काम सखाराम शिंदे हे करीत असत, ही आठवणही मोरे यांनी सांगितली. विशेष म्हणजे (स्व.) शिंदे यांचे चित्रकलेचे हे कलागुण पणतू म्हणजे सुवर्णा मोरे (वडगाव पान, संगमनेर) यांचा मुलगा नीरज मोरे याच्यात आहेत. १९ वर्षाचा हा युवक फार्मसीचे शिक्षण घेत असला तरी फावल्या वेळात छान व्यक्तिचित्रे रेखाटतो. चित्रकलेच्या विविध परीक्षाही त्याने दिल्या आहेत. आजोबा सखाराम शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढल्यावर त्याला सरकार दफ्तरी मान्यता मिळाली, हा शिंदे-मोरे परिवाराच्यादृष्टीने अभिमानाचा व कौतुकास्पद क्षण असल्याची भावनाही सुवर्णा मोरे यांनी आवर्जून व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post