परतफेडीच्या मुदतीआधीच नगर अर्बन बँकेकडून कारवाई; कर्जदार दाम्पत्याने दिला आत्महत्येचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर अर्बन बँकेकडून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची मुदत संपण्याच्या दोन वर्ष अगोदरच हप्ते थकल्याच्या नावाखाली कंपनी सील करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, बँकेने गैर मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप उद्योजक भारती काळे व अनिल काळे यांनी आज (शनिवारी) पत्रकारांशी बोलताना केला. बँकेने ठोकलेले सील परत मागे घेतले नाही, तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा या दाम्पत्याने दिला आहे.

भारती काळे व अनिल काळे यांचे नगरच्या एमआयडीसीमध्ये स्वप्नील इंजिनिअर्स या नावाने युनिट आहे. लघु उद्योजक म्हणून ते 2010 सालापासून याठिकाणी व्यवसायात आहेत. व्यवसाय करता कर्ज घेण्यासाठी त्यांनी 2014 मध्ये नगर अर्बन बँकेच्या सावेडी शाखेतून ३३ लाखाचे व नजर गहाण कर्ज २५ लाखाचे घेतले होते.या कर्जाची परतफेड करण्याची मुदत डिसेंबर २०२१ पर्यंत आहे.

या कर्जप्रकरणाबाबत भारती काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, २०१८ पर्यंत या कर्जाची परतफेड आम्ही नियमितपणे केली. या दरम्यान माझ्या पतीचा अपघात होऊन त्यांच्या उजव्या पायाची हाडे मोडली गेली. मोठा वैद्ययकिय खर्च झाला. तसेच या दरम्यान नोट बंदी झाल्याने त्यामुळेही अडचणी वाढल्या. त्यामुळे परतफेड होऊ शकली नाही. बँकेने २०१९ मध्ये २ नोटिसा आम्हाला दिल्या. त्याला उत्तर देताना परतफेडीस तयार असल्याचे व त्यासाठी मुदत देण्याची आमची मागणी होती. पण बँकेने १ जानेवारी २०२० रोजी कर्ज फेडीची मुदत संपण्याच्या २ वर्षे आधीच आमचे युनिट सील केले.

युनिटच्या कामाची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम त्यावर झाला. बँकेकडे कर्ज घेताना आम्ही आमच्याकडे असलेले भिडे हॉस्पिटल शेजारील स्नेहा फॅशन या नावाचे दुकान सुद्धा बँकेला मॉरगेज म्हणून दिले होते. या दुकानामध्ये किमान पाच ते सात महिला काम करत होत्या. तसेच एमआयडीसीच्या युनिटमध्ये सात ते आठ कामगार आमच्याकडे काम करत होते. २०१६ पासून अपघातानंतर आमची परिस्थिती खालावली केली व बँकेचे हप्ते भरण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे उरले नव्हते. आम्हाला बँकेने थेट २०१८ साली शेवटच्या महिन्यामध्ये नोटिस पाठवून तुमच्याकडे थकीत असलेली पन्नास लाख रुपये त्वरित भरा व त्यानंतर २०१९ साली जानेवारी महिन्यामध्ये थेट नव्वद लाख रुपये तुम्ही भरा, अशी नोटीस बजावून त्यांनी आमच्या कंपनीला टाळे ठोकले व कंपनी सील केली.

वास्तविक पाहता आम्ही बँकेचे सर्व हप्ते भरण्यास तयार आहोत, असे आम्ही बँकेला वारंवार सांगितले होते. मात्र बँकेचे अधिकारी कोणत्याही प्रकारे ऐकायला तयार नव्हते. जे प्रशासक तेथे नियुक्त होते, त्यांची भेट सुद्धा आम्हाला घेऊ दिली नाही, असा आरोप काळे यांनी यावेळी केला.

अर्बन बँकेने आम्हाला २०२१ सालापर्यंत कर्ज दिलेले होते. त्या मुदतीच्या आतच त्यांनी दोन वर्षे अगोदर आमच्या कंपनीला सील केल्यामुळे दोन वर्ष उद्योग-व्यवसाय बंद पडला. आज आम्ही आमची उपजीविका करू शकत नाही व कर्ज रक्कमही देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र आमची पैसे भरण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी कंपनी सुरू झाली पाहिजे, असे भारती काळे यांनी सांगितले. आज आमचे दुकान बंद आहे व कंपनी सील केल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे व याला जबाबदार नगर अर्बन बँकेचे अधिकारीच आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे आम्हाला कोणीही न्याय द्यायला तयार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना १२ फेब्रुवारी रोजी या संदर्भात निवेदन दिलेले आहे. पण अद्याप त्यांची व आमची भेट होऊ शकली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

एखादी महिला उद्योजक जर अडचणीत सापडली, तर तो उद्योग-व्यवसायात मोडीत काढण्याचा प्रकार नगर अर्बन बँकेकडून झाला आहे, असा घणाघाती आरोपही काळे यांनी यावेळी केला. मुदतीच्या आत तुम्ही कंपनी बंद करताय हा एक प्रकारे अन्यायच आहे. कोरोना काळामुळे अडचणीत असलेल्या उद्योगांना मदत करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. पण त्यादृष्टीनेही नगर अर्बन बँकेने आमचा विचार केलेला नाही, असा दावा करून भारती काळे म्हणाल्या, आगामी काळामध्ये यातून मार्ग निघाला नाही, तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमची कंपनी सुरू झाली, तर आम्ही कर्जफेड करण्यास तयार आहोत, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

दरम्यान, काळे दाम्पत्याने २०१४ मध्ये कर्ज घेतले\ तेव्हा बँकेनेच त्यांची कंपनी व दुकान मालमत्तेचे व्हॅल्यूएशन १ कोटी १५ लाख रुपये केले होते. आज २०२१ मध्ये या दोन्ही प्रॉपर्टी सील करून त्यांचा लिलाव करण्याचे जाहीर केले, तेव्हा या मालमत्तेचे व्हॅल्यूएशन ९२ लाख रुपये बँकेने कशाच्या आधारावर दाखवले, असा सवालही त्यांनी केला आहे.

आमची कंपनी सील करण्याच्या एक महिना अगोदर नगर अर्बन बँकेचे काही अधिकारी माझ्याकडे आले व त्यांनी माझ्याकडून बळजबरीने एक धनादेश नेला. खात्यात पैसे नाहीत, असे मी सांगितले. आम्हाला फक्त तुमचा धनादेश द्या, असे त्यांनी सांगितले. तो कोरा धनादेश मी सही करून दिला. त्यानंतर बँकेने आम्हाला न विचारता परस्पर त्याच्यावर ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम टाकून तो बँकेत भरला व तो चेक खात्यात पैसे नसल्याने परत गेला. त्यानंतर चेक बाऊन्स झाल्याबद्दल नगर अर्बन बँकेने न्यायालयात आमच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे, त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. यातही आमची एक प्रकारे फसवणूक केली आहे, असेही भारती काळे यांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post