तू मला नको आहेस.. अखेर तिने भावाच्या मदतीने त्याला संपवले


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मला तू नको आहे, असे म्हणत काही महिन्यांपासून हुज्जत घालणाऱ्या पतीला भावाच्या मदतीने संपवण्याचा प्रकार एका महिलेने केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वाळुंज येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी खून प्रकरणी महिला व तिच्या भावाला अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, किरकोळ कारणावरून वाद होण्याच्या घटना घडल्यानंतर पत्नीने भावाच्या साह्याने नवऱ्याचा खून केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळुंज शिवारामध्ये घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये रामेश्वर दशवंत (राहणार तहाराबाद, तालुका राहुरी) व प्रियांका उर्फ शारदा मोरे (राहणार मोरे वस्ती, वाळुंज) यांचा समावेश असून या दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये संतोष मोरे (वय 42, राहणार मोरे वस्ती, वाळुंज) याचा खून करण्यात आला आहे. रविवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी मोरेवस्तीमध्ये संतोष मोरे यांच्या घरामध्ये ही घटना घडली आहे.

संतोष मोरे व त्याची पत्नी शारदा हिचा काही महिन्यांपासून वेगळ्या कारणाने वाद होत होता. काही महिन्यापूर्वी सोलापूर महामार्गावरील वाळूंज शिवारामध्ये त्यांच्याकडे असलेल्या जमिनीचे पैसे त्यांना मिळालेले होते. संतोष याने पत्नीबरोबर वाद घालून तू मला नको आहेस, असे म्हणत तिच्याशी वादविवाद करायचा. त्याच्या या म्हणण्याचा राग सातत्याने आल्यानंतर त्याची पत्नी शारदा हिने आपल्या भावाला याची सर्व हकीगत सांगितली. राहुरी तालुक्यात राहणारा तिचा भाऊ हा तात्काळ तिच्या वाळुंजच्या घरी आला व त्याने संतोषला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने वार केले. या घटनेमध्ये संतोष हा मयत झाला.

घटनेची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी रवींद्र सानप व पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी वरील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी संदीप मोरे (वय वर्ष 38) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोन आरोपींच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post