अहमदनगर: जिल्हा परिषदेचे सत्ताधारी 'त्यापासून' पळ काढताहेत?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा परिषदेत सत्तेत असलेले राष्ट्रवादी व काँग्रेसवाले सर्वसाधारण सभा घेण्याचे टाळताना जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापासून पळ काढत आहेत, असा आरोप भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. लोकसभा व विधानसभेची अधिवेशने कोरोना असतानाही होतात. पण जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा केवळ कोरोनाच्या कारणामुळे होत नाही, हे अनाकलनीय आहे, असाही दावा त्यांनी यानिमित्ताने केला आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा एखाद्या मोठ्या सभागृहात किंवा मंगल कार्यालयात घ्या. तेथे सोशल डिन्स्टन्ससह सर्व निर्बंधांचे पालन करा, असे सुचवून वाकचौरे यांनी म्हटले आहे की, एक वर्ष झाले तरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली नाही. एकंदरीत सत्ताधारी व अधिकारी सर्वसाधारण सभा होऊ द्यायची नाही, या विचाराचे दिसतात. कोरोनाचे संकट असले तरी सगळे नियम तंतोतंत पाळून सभा करावी. कारण, अनेक महत्त्वाचे विषय आहे, महत्त्वाचे ठराव आहे. काही विषय चर्चा करून सर्वसंमतीने मंजूर करायचे असतात, परंतु चर्चा व प्रश्न-उत्तराला फाटा देऊन त्यातून पळ काढण्याचा पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा डाव यातून दिसतो, असा दावा करून त्यांनी पुढे म्हटले की, लोकसभेचे अधिवेशन होते, विधानसभेचे अधिवेशन होते. मग जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेलाच काय अडचण येते. खरे तर सभागृहातील दोन ज्येष्ठ व कर्तबगार सदस्य म्हणजे शिवसेनेचे अनिल कराळे व भाजपचे सदाशिव आण्णा पाचपुते यांचे निधन झाले असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी नियमाचे पालन करून एकत्र आले पाहिजे. म्हणून मागणी आहे की, सर्वसाधारण सभा सर्व नियमांचे पालन करून मोठ्या मंगल कार्यालयात घ्यावी. दरम्यान, भाजपचे गट नेते वाकचौरे यांनी ही मागणी केली असली तरी जिल्हा परिषदेचे सत्ताधारी त्याची दखल घेतात की नाही व सर्वसाधारण सभा होते की नाही, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post