शिक्षण विभागाचे 'ते' आकडे चक्क बोगस?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने, वीटभट्टी, खाणी आणि इतरही ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असून ती हजारोंच्या संख्येत असेल. मग या मजुरांचे स्थलांतरित मुले (विद्यार्थी) फक्त ९०० इतके कमी कसे?, असा सवाल जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. याचाच अर्थ शिक्षणविभागाने केलेली पाहणी बोगस असून अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे, अशी भीतीही यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली आहे.

ऊसतोडणी मजूर,खाणकामगार,वीटभट्टी कामगार आणि इतरही स्थलांतरीत मजुरांच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षी शिक्षण विभाग सर्व्हेक्षण करुन वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देते. चालू वर्षीच्या सर्व्हेक्षणात जिल्हाभरात तालुकानिहाय एकत्रित मिळून 900 विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले आणि 135 विद्यार्थी स्थलांतरित होऊन गेले, अशी माहिती मिळाली. पण, ही माहिती कामचलाऊ आणि घाईघाईने केली असल्याचा संशय असून विद्यार्थी आणि कष्टकरी पालकांवर अन्याय करणारी आहे, असे म्हणणे वाकचौरे यांचे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार (आधीचे आकडे जिल्ह्यांतर्गत स्थलांतरीत विद्यार्थी व नंतरचे आकडे जिल्ह्याबाहेर स्थलांतरित झालेले विद्यार्थी)- अकोले (168/0), कर्जत(12/1), कोपरगाव(55/21), जामखेड (0/34), नगर (0/9), नेवासा(32/4), पाथर्डी (23/48), पारनेर (36/0), राहाता (427/0), राहुरी (33/0), शेवगाव (निरंक), श्रीगोंदा (60/0), श्रीरामपूर (34/0), संगमनेर (20/18), मनपा(निरंक) अशी माहिती आहे. जून 2020 नंतर ते अद्यापपावेतो नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व्हे करण्यात आलेल्या स्थलांतरीत विद्यार्थ्यांची चुकीची माहिती सादर झाल्याचा संशय असून यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. कामचलाऊ प्रवृत्तीमुळे शिक्षण हक्क कायदा केवळ कागदावर असल्याचा आरोप वाकचौरे यांनी केल्याने या विद्यार्थ्यांच्या काटेकोर सर्व्हेक्षणाची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत आपण बारकाईने चौकशी करुन वंचित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचेही वाकचौरे म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post