'यात' नक्कीच लोकप्रतिनिधी व अधिकारी गुन्हेगार असतील!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा खर्च कोट्यावधी रुपयांचा आहे. जिल्हा नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य यंत्रणेने केलेला बराचसा खर्च हा निव्वळ कागदावर असून खर्च न करता बिले अदा केलेली आहेत. राज्य सरकारने याबाबत झालेल्या खर्चाचे कठोर आणि काटेकोर लेखापरीक्षण केल्यास अनेक कोटींचा घोटाळा समोर येईल व यात अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होईल, असा दावा जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठीचा झालेला करोडो रुपयांचा खर्च लक्षात घेता यात कार्यरत असणा-या संबंधितांकडून मोठा भ्रष्टाचार झाला असून याबाबतच्या चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे वाकचौरे म्हणाले.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले, कोरोना कालावधीत अहमदनगर जिल्हा नियोजन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन,आरोग्य यंत्रणा कार्यालयाकडून खर्च करण्यात आलेल्या 28 कोटी रुपयांचे गौडबंगाल जाणून घेण्याचे उद्देशाने नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगून वाकचौरे म्हणाले, कोरोनाच्या कहरात जनतेचे आरोग्य अबाधित रहावे आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हा नियोजन, आरोग्य यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून अनुक्रमे 21कोटी 23 लाख 44 हजार 218 तसेच 4 कोटी 50 लाख आणि 2 कोटी 36 हजारांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात दाखविलेला खर्च आणि झालेल्या उपाययोजना यात तफावत असण्याची शक्यता असल्याने साधारण 28 कोटीच्या खर्चात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट किट 2 कोटी 52 लाख,अँटीजन टेस्ट किट 2 कोटी 43 लाख 60 हजार,आरटीपीसीआर स्वॅब तपासणी साहित्य खरेदी 5 कोटी 29 लाख,शासकीय कोव्हिड सेंटर अनुदान 1 कोटी 70 लाख,ऑक्सिजन पुनर्भरण 1 कोटी 24 लाख याप्रमाणेच कोरोना संबंधित प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हा नियोजन कडून 24 कोटी 48 लाख 88 हजार 779 रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली.त्यापैकी 21 कोटी 23 लाख44 हजार 248 रुपये रक्कम वितरीत केल्याची लेखी माहिती मिळाली. उर्वरित रक्कमही नंतरच्या कालावधीत खर्च करण्यात आली असेल, असे वाकचौरे म्हणाले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडूनही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी तालुकानिहाय 2 कोटी 36 हजार रुपये वितरीत झाले होते. यात नगर 28 लाख 32 हजार,नेवासा 4 लाख 77 हजार,शेवगाव 18 लाख 36 हजार,पाथर्डी 15 लाख,कर्जत 10 लाख 10 हजार,जामखेड 5 लाख,श्रीगोंदा 7 लाख,पारनेर 15 लाख 51 हजार,राहुरी 5 लाख,श्रीरामपूर 10 लाख 52 हजार,राहाता 13 लाख,कोपरगाव 30 लाख 8 हजार,संगमनेर 13 लाख 70 हजार,अकोले 24 लाख असा खर्च झाला.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडूनही 4 कोटी 50 लाख खर्च झाले, अशी माहितीही त्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post