जरे हत्याकांड : बोठेचा दुसरा अटकपूर्व फेटाळला; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता पोलिस बोठेच्या मुसक्या आवळणार की, त्याला सुप्रिम कोर्टात जाण्य़ाची संधी मिळावी म्हणून त्याला जेरबंद करण्यात वेळकाढूपणा करणार, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी बोठेला पोलिसांनी पकडल्याची जोरदार चर्चा शहरभरच नव्हे तर जिल्हाभर होती. पण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. परिणामी, ती अफवाच ठरली असे दिसू लागले आहे. तरीही बोठेचे दोन्ही अटकपूर्व अर्ज फेटाळले गेले असल्याने त्याला कोणत्याही क्षणी पोलिस ताब्यात घेऊ शकतात, असा दावाही पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे दोन महिन्यांपासून पसार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी सोमवारी फेटाळला. याआधीही जिल्हा न्यायालयात बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याला जेरबंद करण्याबाबत पोलिसांवर दबाव वाढला आहे. 

जरे खून प्रकरणात मुख्य आरोपी पत्रकार बोठे याचा समावेश आहे. नगर येथील जिल्हा न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज १६ डिसेंबर २०२०ला फेटाळल्यानंतर त्याने 31 डिसेंबर 2020 रोजी खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सोमवारी या अर्जावर सुनावणी झाली होती, तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील या सुनावणीच्या वेळी उपस्थित होते. यावेळी आरोपीच्या वतीने ॲड. जाधवर यांनी युक्तिवाद केला. सागर भिंगारदिवे हा या घटनेतील आरोपी असून त्याच्याविरुद्ध पत्रकार बोठे याने बातमी छापली होती. त्या रागातून त्याने बोठेचे नाव घेतले आहे. तसेच जरे यांच्याशी आमचे (पक्षकार बोठे) कौटुंबिक संबंध होते, त्यामुळे त्यांच्यात व आमच्यात फोन कॉल्स झाले. जरे याना मारण्याच्या उद्देशाबाबत कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही, असा दावा आरोपीच्यावतीने त्याच्या वकिलांनी केला. त्यावर सरकार पक्षाच्यावतीने ॲड. बडाख यांनी युक्तिवाद केला. भिंगारदिवे व बोठे यांच्यात बातमी छापण्यावरून वाद असले तरी ते दोघेही एकमेकाच्या संपर्कात होते. तसेच रेखा जरे यांच्याशी बोठेचे 30 नोव्हेंबर रोजी संभाषण झाल्याचे कॉल डिटेल्स हा पुरावा पोलिसांकडे आहे. त्यादिवशी जरे यांच्याशी झालेले फोन तसेच सीसीटीव्ही फुटेज, पेन ड्राइव्ह व अन्य तांत्रिक पुरावे तसेच अन्य भक्कम पुरावे आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचे स्पष्ट केले.

देशात काही ठिकाणी शोध
दरम्यान, बोठेचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले होते, त्यानुसार तपासाची सूत्रे हलवण्यात आली आहे. देशात काही ठिकाणी छापे घातले आहेत, पण बोठे याचा शोध लागलेला नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. विविध पथके त्याचा शोध घेण्यासाठी पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले. रेखा जरे खून प्रकरणाला आता साठ दिवस उलटून गेलेले आहेत. पसार आरोपीचा शोध अजून लागलेला नाही. त्याचे दोन्ही अटकपूर्व जामिनासाठीचे अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे तो आता सर्वोच्च न्यायालयात जातो की त्याआधीच पोलिस त्याला हातकड्या घालतात, हे पाहणे महत्त्वाचे झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post