'त्यांची' तलवार, पत्र आणि फोटो माझा अविस्मरणीय संग्रह; कर्नल गोखलेंनी जागवल्या आठवणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांगला देशची निर्मिती झाल्यावर पूर्व पाकिस्तानचे जनरल नियाजी व ९३ हजार सैनिक माझ्या ताब्यात होते. त्यावेळी माझ्यासमवेत केवळ ११० सैनिक होते, पण आम्ही घाबरत नव्हतो. अशा स्थितीत मी जनरल नियाजी यांना भेटून त्यांच्यासमवेत फोटो घेतला, त्यांच्याकडून माझ्यासाठी एक पत्र लिहून घेतले व त्यांची तलवारही भेट म्हणून मिळवली, या तिन्ही भेटी माझ्या लष्करी जीवनातील अविस्मरणीय क्षण आहेत'', असे निवृत्त लेफ्टनंट कर्नल अनंत गोखले यांनी सांगितले आणि 'एमआयआरसी'मध्ये उपस्थित लष्करी अधिकारी व जवान तसेच १९७१च्या युद्धात सहभागी झालेल्यांच्या कुटुंबियांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तसेच कार्यक्रम संपल्यावरही अनेकांनी गोखलेंना भेटून त्यांच्यासमवेत फोटो काढण्याचा आनंद घेतला.

भारताने १९७१मध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला ५० वर्षे झाल्याने त्याचा सुवर्ण महोत्सवी जल्लोष भारतीय लष्कराद्वारे केला जात आहे. यानिमित्त एमआयआरसीमध्ये आलेल्या मशाल ज्योतीचे स्वागत झाले व युद्ध दिग्गज आणि वीर नारींचा सन्मान शनिवारी झाला. या कार्यक्रमात कर्नल गोखले यांनी १९७१च्या युद्धाच्या आठवणी जागवताना त्या युद्धात भारतीय लष्कराने गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची माहिती दिली. तो म्हणाले, ''भारतीय लष्कराच्या दृष्टीने ऑक्टोबर १९७१पासूनच त्या युद्धाची तयारी सुरू झाली होती. ३ डिसेंबरला युद्ध सुरू झाल्यावर आमची तुकडी पूर्व पाकिस्तानमधील ढाक्याच्या दिशेने शौर्य गाजवत कूच करीत १५ डिसेंबरला ढाक्याजवळ पोहोचली होती. १६ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली व त्यांच्या सैनिकांनी आत्मसमर्पण केले. १६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता शरणागतीच्या त्या कागदावर भारताकडून जनरल अरोरा व पाकिस्तानकडून जनरल नियाजी यांनी सह्या केल्या. माझी सहा फूट उंची असल्याने त्या फोटोत मीही आलो व दुसऱ्या दिवशी जगभरातील सर्व वृत्तपत्रांमधून झळकलो. त्यानंतर जनरल नियाजी व त्यांच्या ९३ हजार सैनिकांना माझ्या ताब्यात देण्यात आले. आमची ११०जणांची तुकडी होती, पण आम्हाला भीती वाटली नाही. माझ्या ताब्यात असताना जनरल नियाजींना मी भेटलो व तब्बल दोन तास अवांतर गप्पा त्यांच्याशी केल्या. मी कॅप्टन व ते जनरल असतानाही त्यांच्यासमवेत स्वतःचा फोटो काढून घेतला, त्यांच्याकडून माझ्यासाठी त्यांच्या हस्ताक्षरात शुभेच्छा देणारे पत्रही लिहून घेतले व त्यांची तलवारही भेट म्हणून मिळवली,'' असे सांगून कर्नल गोखले म्हणाले, ''आयुष्यात विसरता येणार नाही, अशा या भेटी व तो काळ होता. मात्र, त्यावेळी पाकिस्तानचे सैनिक युद्धकैदी असतानाही घमंड दाखवत होते, आम्ही आता हरलो असलो तरी याचा बदला घेऊ, असे त्यावेळी ते आम्हाला बोलून दाखवायचे. त्यामुळे ते नेहमी बदला घेण्याचा प्रयत्न करतात, पण भारतीय लष्कर त्यांना नेहमीच पराभूत करते. तरीही भारतीय जवानांनी निरंतर सावध राहणे आवश्यक आहे,'' असेही कर्नल गोखले यांनी आवर्जून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post