कोरोना रिटर्न्स : कारवाईसाठी 'ते' दोघे सरसावले.. मास्क नसलेले घेतले रडारवर

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

८-९ महिन्यांचा करोनाचा लॉकडाऊन व विविध निर्बंध पाळलेल्या अहमदनगरकरांवर पुन्हा करोनाचे सावट घोंघावू लागले आहे. अर्थात नुसते अहमदनगरच नव्हे तर राज्यभरात हे सावट आहे. या पार्श्वभूमीवर, कोरोना गेल्याच्या भ्रमात गर्दीत जाऊ नये, गर्दी करू नये, मास्क लावावे, हात सॅनिटाईज करावे, सोशल डिस्टन्स पाळावे, असे सारे निर्बंध धुडकावून लावलेल्या अहमदनगरकरांना पुन्हा चाप बसवण्यासाठी व कोरोना संकट अजूनही टळलेले नाही, याची जाणीव करून देण्यासाठी जिल्ह्याचे प्रशासकीय सर्वेसर्वा मानले जाणारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे दोघे आता सरसावले आहेत. सोमवारी या दोघांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत मास्क न वापरणांवर कारवाई तर केलीच, पण मंगल कार्यालयांची दारे बंद करून आत धडाक्यात विवाह समारंभ करणारांवरही कारवाई केली. मंगल कार्यालयांतील कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची काटेकोर तपासणी नियमितपणे करण्याचेही नियोजन केले आहे.


कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी नगर शहरांमध्ये मंगल कार्यालये तसेच महाविद्यालयामध्ये धडक देऊन कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भामध्ये जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की, आम्ही सर्व यंत्रणांना आदेश दिले आहेत. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 2009 दंडात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. लोकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जर नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केल्यानंतर काही निर्बंध घालून दिले आहेत. मास्क लावावा हे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिल्यानंतर जिल्हाधिकारी भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी संयुक्तपणे नगर-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या ताज, आशीर्वाद व सिटी लॉन या मंगल कार्यालयांतून तसेच गर्दीच्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांनी माहिती घेतली. या ठिकाणी लग्न कार्यामध्ये आलेल्या नागरिकांनी मास्क परिधान केले नव्हते तसेच नियमांचे सुद्धा उल्लंघन केले होते. विशेष म्हणजे काही लॉनचे गेट हे बाहेरून बंद करण्यात आले होते. आतमध्ये लग्न समारंभाचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ दरवाजे उघडण्यात आले. आतमध्ये पथकाने पाहणी केल्यानंतर या ठिकाणी कुठे नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आल्यानंतर तात्काळ यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिले. त्यानंतर नगर महाविद्यालयामध्ये सुद्धा त्यांनी समक्ष जाऊन पाहणी केली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मास्क वापरला आहे की नाही, याची पाहणी केली व कॉलेज प्रशासनासमवेत चर्चा करून येणारे विद्यार्थी मास्क वापरतात की नाही तसेच नियमांचे पालन करतात की नाही, याची विचारणा केली. या परिसरामध्ये दोन विद्यार्थी हे मास्क न लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले गेले.

यानंतर बोलताना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, 'मुंबई आणि पुणेसह गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, मुंबई आणि पुणे आणि नाशिक या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्याकडेही त्याचे सावट आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पूर्वतयारी आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कोरोनाच्या संदर्भात दामिनी यंत्रणेला तसेच आरोग्य यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या आहेत आणि त्या अनुषंगाने असे लक्षात येते की, जास्तीत जास्त लग्न समारंभाच्या प्रसंगी गर्दीचे प्रकार होत आहेत. कलम 144 आदेश पारित केलेले आहेत व ते लागूही आहेत. मात्र, नागरिक थोडेसे निर्बंध शिथिल झाल्यासारखे वागत आहे म्हणून त्यांना परत शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू केले गेले आहेत. मंगल कार्यालयामध्ये जवळपास पावणे दोनशे ठिकाणी कारवाई झालेल्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. मास्कचा वापर न करणे, नियमापेक्षा जास्त लोक दिसून आले तिथे मंगल कार्यालयाचे चालक-मालक व वर्‍हाडी मंडळींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, दोन दिवसांमध्ये 248 मंगल कार्यालयांना नोटिसा देण्यात आल्या आहे. दोन दिवसांमध्येच आम्ही साधारण दोन हजार तीनशे जणांवर कारवाई केली आहे. २ लाख ३० हजाराचा दंड वसूल केला आहे. मंगल कार्यालयांच्या मालकाची जबाबदारी आहे व त्यांनी कार्यालय देत असताना मास्क व लोकांची संख्या याचे निर्बंध पाळणे आवयशक आहे. नगर शहरासह जिल्हाभरात पोलिस प्रशासनाच्यावतीने नाकेबंदीदेखील करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी लोकांनी मास्क घातले नसल्यास त्यांना त्याच ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post