अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आता 'हायवे मृत्युंजय दूत' योजना


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महामार्गावरील रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी राज्यात हायवे मृत्युंजय दूत योजना राबवली जाणार आहे. पोलिस व अपघातस्थळाच्या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही योजना राबवली जाणार आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवली जाणार आहे व दर महिन्याला दोन वेळा या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला जाणार आहे. नगर जिल्ह्यातून पुणे, औरंगाबाद, कल्याण, मनमाड, सोलापूर, जामखेड, पाथर्डी व दौंड असे महामार्ग जात असल्याने या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातही होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या अंमलबजावणीचे नियोजन आता प्रतीक्षेत आहे.

हायवे मृत्युंजय दूत या योजनेबाबतची माहिती अशी की, भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातामध्ये दीड लाख लोकांचा मुत्यु होतो. रस्ते अपघाताचे विश्लेषण केल्यावर असे दिसून येते की, बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना योग्य उपचार मिळत नाही व योग्यवेळी रुग्णालयात नेले जात नाही किंवा अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना जखमी व्यक्तीस व्यवस्थित न उचलल्यामुळे किंवा अज्ञानाने हाताळल्यामुळे जखमी व्यक्तीच्या शरीरास अधिक इजा होते व प्राणहानीचे प्रमाण वाढते. समाजामधील काही चांगले लोक अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करतात, परंतु बरेच लोक पोलिसांचा किंवा न्यायालयाचा ससेमिरा टाळण्यासाठी अपघातग्रस्तास मदत करीत नाही. तसेच अपघातग्रस्त किंवा जखमी व्यक्ती अनोळखी असल्यास रुग्णालयात किंवा दवाखान्यात उपचार करण्यास वेळ लावतात किंवा विलंब करतात. यासाठी गोल्डन अवर (Golden hour) मध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रुग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरित मिळण्यासाठी हायवे मृत्युंजय दूत" ही योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा अशी- १ ) आपल्या अखत्यारीतील महत्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल, पेट्रोलपंप, लोकल ढाबा किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्गाचे आजूबाजूच्या गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करण्यात यावा व त्यांना "मृत्युंजय देवदूत" नावाने संबोधण्यात यावे. २ ) खाजगी, सरकारी, निमसरकारी तसेच स्वयंसेवी संस्थेच्यामार्फत या देवदूत व्यक्तींना दोन तासाचे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीस कसे हाताळावे किंवा कसे उचलावे, याचे प्राधान्याने प्रशिक्षण द्यावे. ३ ) देवदूताच्या प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहीत्य (First Aid Kit) देण्यात यावे. ४ ) आपल्या अखत्यारीतील महत्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गानजिकच्या हॉस्पिटलची नाव-पत्ते व संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत व याची माहिती देवदुत यांना सुध्दा द्यावी. ५ ) १०८ हा दुरध्वनी क्रमांक अॅम्बुलन्ससाठी असून सदर अॅम्बुलन्स कोठे उभी असते, याची माहीती घ्यावी. तसेच अपघातग्रस्त व्यक्तींना अॅम्बुलन्सद्वारे गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात त्वरीत कसे पाठविण्यात येईल याची उपाययोजना करावी. ६ ) खाजगी व इतर रुग्णालयास संलग्न असणाऱ्या अॅम्बुलन्सची माहितीसुध्दा गोळा करावी आणि या कामासाठी त्यांचासुध्दा उपयोग करुन घ्यावा. ७) आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेली "स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना" या योजनेची माहिती अपघातग्रस्त, त्यांचे नातेवाईक आणि सर्व संबंधितांना द्यावी. ८) "हायवे मृत्युंजय दूत' यांना महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्र द्यावे व चांगले काम केल्यास देवदूत यांना प्रशस्तीपत्र द्यावे. ओळखपत्राचा कोठेही दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी. ९ ) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेले ' ' GOOD SAMARITANAWARD ' साठी चांगले काम केलेल्या देवदूतांची नावे कळवावीत. १०) सदर योजना राबविण्यासाठी जास्तीतजास्त स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. ११) सदर योजनेस स्थानिक वृत्तपत्र, केबल यंत्रणा व सोशल मिडियाद्वारे प्रसिद्धी द्यावी. सदर योजना १ मार्च २०२१ पासून सुरू करावी व याबाबतचा अहवाल प्रत्येक महिन्याचे १५ व ३० तारखेला मुख्यालयास सादर करावा, असे वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आदेष दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post