खड्ड्यांतून गाड्या चालवताय? मग 'ही' काळजी घ्या..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता.. हा गहन प्रश्न पायी चालणारांपासून सायकल, दुचाकी, चारचाकी किंवा प्रवासी बस वा अवजड वाहने चालवणाऱ्या प्रत्येकासमोर असतो. अशास्थितीत रस्त्यांतील खड्डे हा आता भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार असे सहज म्हणण्यासारखा परवलीचा विषय झाला आहे. त्यामुळेच खड्डे हे आता जीवनाचा भाग झाल्याने त्यापासून वाचण्याचे उपाय शोधणे आपल्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर नगर येथील 'व्यायामाद्वारे वेदनामुक्ती'चे तज्ज्ञ डॉ. अमोल खांदवे यांनी खड्ड्यांतून वाहने चालवताना घ्यावयाची काळजी, याबाबत विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. खड्डे वाचवताना शारीरिक हानी व वाहनाची हानी कशी टाळता येऊ शकते, यावर त्यांनी काही टिप्स सोशल मिडियातून व्हायरल केल्या आहेत.

शासनाच्याच नव्हे तर महापालिका व जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बजेटमधील किमान २५ ते ३० टक्के रक्कम केवळ नवे रस्ते तयार करणे व ते तयार झाल्यावर त्यावर पडलेले खड्डे बुजवणे यातच खर्च होत असतात. पण या कामाला टक्केवारीचा शाप लागल्याने हा खर्च सत्कारणी लागल्याचा अनुभव फारसा येत नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. खांदवे यांनी सुरू केलेली विशेष जागृती मोहीम कौतुकास्पद ठरली आहे. या मोहिमेची सविस्तर माहिती अशी..

खड्डेयुक्त रस्त्यांवर गाडी चालवण्याची टेक्निक
संपूर्ण जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र खड्डेमय झाला आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, सोशल नेटवर्किंग साइट्सवर निषेधाचा वर्षाव सुरू आहे. मागील वर्षीच्या मुसळधार पावसाने आधीच रस्त्यांची चाळण झालेली होती. त्यात एका बाजूला उड्डाणपुलाचे काम तर दुसऱ्या बाजूला भूमिगत पाणी योजना, विविध रस्ते बनवणे ही सर्व कामे एकाच वेळी सुरू आहेत. पूर्ण गावच (मध्य अहमदनगर शहरात हीच स्थिती आहे) खोदून ठेवल्यासारखी स्थिती आहे. विकासकामे करायची असतील तर आपल्याला थोडा काळ त्रास सहन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच या कठीण काळात आपल्या नियंत्रणात असणाऱ्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. रस्ते दुरुस्ती होईपर्यंत मधल्या काळामध्ये अनेक वेदनाग्रस्त रुग्ण तयार होत आहेत. मान-कंबरदुखी असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात प्रामुख्याने मार्केटिंगसाठी दिवसभर फिरावे लागणाऱ्या व्यक्ती (ज्यांना दिवसभर वारंवार दुचाकीवर बाहेर पडावे लागते), डिलिव्हरी द्यावी लागते, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशांची संख्या सर्वात जास्त आहे. आपल्याकडे रस्ते खराब आहेतच अन त्यासोबतच गाडी चालवण्याच्या योग्य शरीरस्थितीबाबतचे अज्ञानही आहे. 'अंडर रिपेअर' रोड वरून गाडी योग्य शरीरस्थिती ठेवून चालवणे आपण नक्की करू शकतो. त्यामुळे या सूचना अंमलात आणल्यास मान-कमरेत खड्ड्यांमुळे होणारी वेदनानिर्मिती नक्की टळेल.

दुचाकी गाडी
टू व्हीलर हा सगळ्यांचाच जीव की प्राण आहे. जेव्हा गाडी खड्ड्यात आदळते, तेव्हा गाडीचा शॉक अॅबसॉर्बर जोरात खाली जातो आणि पुन्हा वर येतो. तसाच एक शॉक घेणारा भाग निसर्गाने आपल्या शरीरात दिलेला आहे. ज्याचे नाव आहे इंटरर्व्हर्टिब्रल डिस्क किंवा मणक्यातील चकती. कुठलीही हालचाल करत असताना या चकतीवर दाब पडत असतो. अगदी चालत असताना सुद्धा. जमिनीचा धक्का व आपल्या वजनामुळे पडणारा दाब यामुळे वारंवार तिथे आकुंचन व प्रसरण होत असते. गाडी चालवताना हे आकुंचन-प्रसरण वेगात व वारंवार झाल्यामुळे हळूहळू तिथे काही नकोसा बदल व्हायला लागतो. त्यामुळे कंबरदुखी सुरू होते, संपूर्ण पाय दुखायला लागतो, हाता-पायाला मुंग्या येणे, चक्कर येणे अशी बरीचशी वेगवेगळी लक्षणे निर्माण व्हायला लागतात. यावर उपाय - टू व्हीलरवर बसताना सर्वात आधी कमरेत न वाकता छाती-पोट पुढे काढून थोडेसे सरळ बसायचे आहे. आपले हात कोपरात सरळ ठेवावेत, वाकलेले नको. दोन्ही खांदे हलकेसे वर उचललेले आणि हँडलवर पुढे थोडासा दाब ठेवून गाडी चालवायची आहे. यामुळे जेव्हा गाडी खड्ड्यातून जाईल, त्यावेळेस जो धक्का लागणार आहे, त्यातला बराचसा भाग आपल्या खांद्याच्या वरचा भाग सांभाळून घेईल. पोट पुढे काढल्यामुळे कमरेवर पडणारा दाब बराचसा कमी पडेल. या दोन गोष्टी एकत्रित केल्यास आपण कमरेचा भाग व मान दोन्हींचे रक्षण करू शकतो.

गाडी व बॅग
बऱ्याच जणांना गाडीच्या टाकीवर छोटीशी बॅग ठेवून नेण्याची सवय असते. ती बॅग तशी ठेवण्यासाठी तुमच्या पायांना बरीशी ॲडजस्टमेंट करावे लागते आणि पायांसाठी वर कमरेला स्वतःमध्ये बदल करावा लागतो. जो बदल चुकीचा आहे. तसे न करता पाठीला लटकवण्याची बॅकसॅक वापरावी. ती वापरत असतानासुद्धा बऱ्यापैकी शरीराला पाठीला आवळून बांधावी. जेणेकरून बॅग व शरीर एकसंध वाटावे, वेगळे वाटू नये. जर ती बॅग हलत असेल तर मानेच्या भागाकडे ताण वाढू शकतो.

गाडी व ओझे
गाडीला जर पाठीमागे ओझे बांधत असाल तर ते दोन्ही बाजूंनी समान येईल, असे पाहावे. त्यासाठी बाजारात मिळणारे हुक वापरावे. गाडीला कॅरेज वापरत असाल तर वजन दोन्हीकडे समांतर व सारखे होईल असे पाहावे. आपल्याला दूध घालणाऱ्या व भाजी विकणाऱ्या भाऊंना ही सूचना जरूर सांगा. त्यांना या गोष्टीची कल्पना नसते की एका बाजूला जर वजन जास्त असेल तर त्या बाजूचा खुबा व कमरेचा भाग थोडासा खाली झुकलेल्या स्थितीत राहतो. त्याला अॅडजेस्ट करण्यासाठी दुसर्‍या बाजूच्या नितंब स्नायूंना आक्रसून राहावे लागते. त्याचा शेवटी ताण मज्जारज्जूवर येतो. गाडीच्या पाठीमागे जर बसत असाल तर पोट पुढे काढून बसणे व थोडेसे खांदे वर उचलणे एवढा बदल पुरेसा आहे.

गाडी व मोबाइल
गाडी चालवताना मोबाईल बिलकुल वापरू नये. अगदी जरुरी असेल तर फोन घेण्यासाठी गाडी बाजूला घ्यावी किंवा एअर फोन वा वायरलेस हेडफोन वापरावेत.

गाडीचा वेग
गाडीचा वेग मर्यादित असावा. जेवढा वेग जास्त, तेवढी इजा जास्त. खूप वेगात जाऊन व अगदी सावकाश जाऊन सुद्धा घरी पोहोचण्यात फक्त दोन ते तीन मिनिटांचा फरक पडत असतो. परंतु आपण उगीचच घेतलेल्या घाईच्या ताणामुळे आपले शरीर व मन दोन्ही आक्रसलेल्या स्थितीत राहते. गाडीवरून उतरल्यानंतरचे प्रतिसाद व निर्णय चुकतात. शरीर-मानसिक ऊर्जेचा हा खूप चुकीचा व टाळता येणारा ऱ्हास आहे. सावकाश गाडी चालवत जाण्याचा एकदा प्रयोग करून बघा. सर्वांनी सोबत हे केल्यास ट्रॅफिक समस्या बरीच कमी होऊ शकेल.

चार चाकी गाडी चालवणे
फोर व्हिलर चालवताना छाती व पोट थोडेसे पुढे काढून बसायचे आहे. अशा पद्धतीने दोन मिनिटे चालवल्यास त्यानंतर पुढील दहा मिनिटे एकदम रिलॅक्स राहावे. दुसरी पद्धत म्हणजे डोके व खांदे मध्ये-मध्ये सीटवर पाठीमागे दाबून धरायचे व पोट पुढे काढून बसायचे. 

फोर व्हिलर व मोबाईल
खड्ड्यामुळे जेव्हा गाडी आदळते तेव्हा मान स्प्रिंगसारखी पुढे-मागे धक्के घेत असते. त्यावेळी जर मोबाईलवर टायपिंग करत असाल तर तर तो ताण खूपच जास्त असतो. त्यामुळे शेजारी बसलेला असताना सुद्धा, अगदी बसमध्ये बसलेले असताना सुद्धा मोबाईल वापरु नका. 

बॅकरेस्ट 
फोर व्हीलरमधील बहुतेक सीट हे बकेट सीट असतात, जे पाठीमागच्या बाजूला उतार असणारे असतात. जे अगदी चुकीचे आहे. त्याच्यामुळे कमरेच्या खालच्या भागामध्ये चौथ्या-पाचव्या मणक्याजवळ जास्त दाब राहतो. पाठीमागे बॅकरेस्ट उशी ठेवण्यापेक्षा पुढे उतार असणाऱ्या उशीवर बसलेले फायदेशीर.

इतर काही बाबी
गाडीच्या टायरमध्ये हवा कमी असणे किंवा जास्त असणे या दोन्ही वेळेस उत्पन्न होणारे व्हायब्रेशन्स वाढतात. या गोष्टींकडेही सतत लक्ष देणे गरजेचे आहे. शॉक अॅबसॉर्बर हे काही हजार किलोमीटर नंतर बदलावे लागतात, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. आपल्या मेकॅनिककडून त्यांची वेळोवेळी ट्युनिंग करून घेतल्यास त्यांची कार्यक्षमता देखील वाढेल.

Post a Comment

Previous Post Next Post