मंत्री शिंदेंनी दिले नगरला १३ कोटी व जिल्ह्याला आश्वासने


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर महापालिकेद्वारे सावेडीत होत असलेल्या एक हजार आसन क्षमतेच्या नाट्यगृहाला ५ कोटी, मध्य नगर शहरातील बाळासाहेब देशपांडे प्रसुतीगृहाच्या नूतनीकरणासाठी ५ कोटी व शहरात (सावेडी) नव्या स्मशानभूमीसाठी ३ कोटी, असा १३ कोटीचा विशेष निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे जाहीर केला. जिल्ह्यातील नगरपालिका-नगर परिषदा व नगरपंचायतींना त्यांनी कोणताही विकास निधी जाहीर केला नाही. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे त्या-त्या शहरात राबवल्या जात असलेल्या पाणीपुरवठा, ड्रेनेज योजना व घनकचरा व्यवस्थापन योजनांचे रखडलेले प्रस्ताव तातडीने पाठवा व मंजूर झालेल्या प्रस्तावांनुसार तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. तसेच योजना राबवताना येणाऱ्या आर्थिक अडचणीबाबत नव्याने शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यास त्यास तातडीने मंजुरी देण्याची ग्वाही मात्र दिली. दरम्यान, नदी-नाल्यांच्या काठावरील गाळपेर भागात होणारी व शहरांतूनही होणारी कोणतीही अनधिकृत बांधकामे यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत व स्थानिक स्वराज्य संस्थांनीही यापुढे अनधिकृत बांधकामे त्यांच्या क्षेत्रात होऊ देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मनपा, जिल्हा परिषदा व नगर पालिका क्षेत्रांसाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डीसीआर) तयार केली असून, नगर शहर व जिल्ह्यातील त्याच्या अंमलबजावणीचे सादरीकरण मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हान नियोजन भवनात झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री शिंदे यांनी या नव्या नियमावलीची वैशिष्ट्ये सांगितली व यामुळे शहर विकास योजनेत होणारी दिरंगाई व अन्य अडथळे टळतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगर विकास खात्याचे सचिव महेश पाठक, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, पारनेरचे आमदार निलेश लंके, नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी भोसले यांनी महापालिकेच्या तसेच जिल्ह्यातील विविध नगरपालिकांच्या विविध विकास योजनांचा आढावा सादर केला. या बैठकीस नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मात्र अनुपस्थित होते. मात्र, मनपातील राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, बसपाचे नगरसेवकही अनुपस्थित होते. फक्त शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. कोविडमुळे निधी वितरणात आर्थिक अडचणी येत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार टप्प्या टप्प्याने कामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पुलाला स्व.राठोडांचे नाव
नगर शहरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाद्वारे उड्डाणपुल होत असून, या पुलाला नगर शहराचे शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत अनिलभय्या राठोड यांचे नाव देण्याची मागणी मंत्री शिंदे यांच्याकडे या बैठकीत करण्यात आली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व मनपाच्या महासभेत तसा ठराव करण्याची सूचना महापौर वाकळेंसह सेना नगरसेवकांना केली. हा ठराव नगरविकास खात्याकडे पाठवल्यावर पुलाला (कै.) राठोड यांचे नाव देण्याबाबत पुढील आवश्यक प्रक्रिया करण्याची ग्वाही दिली. तसेच नगर शहरात छत्रपती संभाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे उभारण्याबाबतचे प्रस्तावही नगर विकास विभागाकडे पाठवण्याची सूचना त्यांनी केली.

आस्थापना खर्चावर अडले
मनपाचा आस्थापना खर्च ७० टक्के म्हणजे निकषापेक्षा दुप्पट असल्याने रिक्त पदे भरतीला परवानगी देण्यास अडचण असल्याचे मंत्री शिंदे व सचिव पाठक यांनी आवर्जून स्पष्ट केले व मनपासह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले उत्पन्न सोर्स वाढवण्याची गरजही मांडली. प्रशासन व नगरसेवकांनी यादृष्टीने गांभीर्याने प्रयत्न करण्याचेही सांगितले. नगर शहरातील रखडलेल्या फेज-२ पाणी योजनेची चौकशी करण्याची ग्वाही देताना अमृत योजनेतील पाणीपुरवठा व अन्य विकास कामांना गती देण्याची सूचना केली. 

पिंपळगाव माळवी येथील मनपाच्या ७०० एकर जागेत फिल्म सिटी तसेच चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केट बांधकामासाठी नगर विकास विभागाद्वारे सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्यातील नगरपालिकांना मागील वर्षी ५३ कोटींचा विकास निधी दिला होता, तो यंदाही दिला जाणार आहे. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या क्षेत्रात मंजूर असलेल्या पाणीपुरवठा, ड्रेनेज व अन्य शासकीय योजनांतील अडथळे दूर करून त्या मार्गी लावण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. नगर शहराचा पर्यटन वाढीच्यादृष्टीने प्रकल्प आराखडा तयार करण्याचेही त्यांनी सुचवले.

नवा महापौर.. स्पष्ट उत्तर टाळले
नगर महापालिकेत याआधी शिवसेनेचे दोन महापौर करण्यात महत्त्वाची भूमिका मंत्री शिंदे यांनी बजावली असल्याने लवकरच होणाऱ्या महापौर निवडीत हे पद शिवसेनेला मिळणार काय, या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देणे मंत्री शिंदेंनी टाळले. महापौर निवडीला अजून वेळ आहे, योग्य वेळ आल्यावर कोणाचा महापौर होणार, याबाबत सांगू, असे हसत हसत त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post