भाजपला विरोध करणाऱ्यांना फडणवीस बदनाम करतात : मंत्री हसन मुश्रीफ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'विविध मुद्द्यांवरून भाजपला विरोध करणाऱ्यांना ईडी चौकशी वा इन्कम टॅक्स छापे यासह विविध माध्यमातून बदनाम करण्याचे काम विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत,' असा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केला.

नगरच्या पोलीस मुख्यालयात जिल्हा नियोजन मंडळातून पोलीस दलाला देण्यात आलेल्या नवीन वीस गाड्यांचे वितरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, 'भाजपच्या विरोधात बोलणार्‍यांना देशद्रोही म्हणून संबोधले जाते व त्यांच्या विविध मार्गाने चौकशा करणे, तसेच त्यांना बदनाम करण्याचे प्रकार होतात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच हे सारे करीत आहेत, अशी माझी खात्री झाली आहे,' असा आरोप करून मुश्रीफ म्हणाले, ' ईडी व सीबीआय चौकशीबाबत महाविकास आघाडीचे राज्य सरकार विशेष कायदा करणार आहे, असे ते म्हणाले. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही. उलट त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघात नागरिकांनी मोर्चाही काढला आहे. शिवसेनेची आज मुंबईत झालेली बैठक वेगळ्या विषयाबाबत झाल्याचे मला समजले आहे. पण भाजप सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे काम हे करीत आहेत. स्वातंत्र्यसंग्रामात भाजप व आर एस एस ने कधीही सहभाग घेतला नाही. परंतु ते आज स्वतःला देशभक्त म्हणून घेत आहेत' अशी घणाघाती टीका करून मुश्रीफ म्हणाले, 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. धनंजय मुंडे यांच्या संदर्भातही मध्यंतरी असेच आरोप झाले होते. पण चौकशीतून काहीच निष्पन्न झालेले नाही व त्या महिलेनेही आरोप मागे घेतले. परंतु भाजपद्वारे एखाद्यावर आरोप करून त्याला आयुष्यातून उठवण्याचे होणारे प्रयत्न योग्य नाहीत, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द केले तर तो संविधानाचा अपमान ठरेल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले होते. त्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'हे कायदे मागे घेतले म्हणजे संविधानाचा अपमान होणार नाही. कारण अशा पद्धतीने या आधीही अनेक वेळा कायदे मागे घेतले गेले आहेत. तसेच या तिन्ही कायद्यांना दीड वर्षाची स्थगिती देण्याची तयारी केंद्र सरकारने केली, म्हणजे एका अर्थाने हे कायदे मागेच घेतले आहेत, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post