राहुल गांधींनी इंटरकास्ट लग्न करावे; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'हम दो हमारे दो'ची भाषा करणाऱ्या राहुल गांधी यांनी आधी लग्न करावे त्यानंतर त्यांचे हम दो हमारे दो होईल व मग त्यांनी हम दो हमारे दो वर बोलावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला व तो देताना राहुल गांधी यांनी इंटरकास्ट मॅरेज करावे व त्याचा चांगला संदेश देशभरात जाईल, असा सल्लाही आठवले यांनी दिला. दरम्यान, पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी राज्यातील मंत्र्याशी संबंधित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही आठवले यांनी केली.

नगरच्या दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपाल यांना विमानाची परवानगी नाकारणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यपाल मसूरी येथे आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जाणार होते परंतु त्यांना विमानात बसल्यानंतर खाली उतरवले गेले, हा त्यांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान झाला आहे, असे सांगून आठवले म्हणाले, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावावर मंजुरी दिली नाही म्हणून राज्यपालांना विमान प्रवास परवानगी नाकारली गेल्याचे बोलले जात असले तरी त्या बारा आमदारांचा विषय न्यायालयात गेलेला आहे व त्यावर न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही होणार आहे, असे आठवले म्हणाले.

26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामागे भाजपचा हात असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे म्हणणे असले तरी त्यात काहीही तथ्य नाही. दिल्लीतील शेतकरी आंदोलनकर्त्यांची भूमिका टोकाची आहे. कृषी कायदे मागे घेण्याची त्यांची मागणी आहे, परंतु हे कायदे मागे घेतले तर यापुढे सर्वच कायदे अशा पद्धतीने आंदोलन करून मागे घेण्याची मागणी होईल व तो संविधानाचा अपमान होईल, असा दावा आठवले यांनी केला. आंदोलनांची पॉलिसी गिव्ह अँड टेक असली पाहिजे. कृषी कायद्यातून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार आहे, पण अदानी व अंबानी यांच्या ताब्यात शेती व धान्य व्यापार जाईल असे म्हटले जात असले तरी अदानी- अंबानी यांचे व्यवसाय वेगळे आहेत व कॉंग्रेसची सत्ता असतानाही ते व्यवसाय करीत होते, असे आठवले यांनी आवर्जून स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post