अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी आमदार जगतापांनी दिले पाच लाख

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिरासाठी नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्रामभैय्या अरुणकाका जगताप व त्यांच्या परिवाराच्यावतीने पाच लाख रुपये देणगी देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी पाच लाखाचा हा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रवींद्र साताळकर, शहर संघचालक शांतीभाई चंदे, अभियानाचे जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, अभियानाचे संयोजक मुकुल गंधे, राजेश झंवर, नंदकुमार शिकरे, अभियानाचे समन्वयक महेंद्रभाई चंदे, श्रीकांत जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, अभियानाचे विस्तारक प्रणव हिंगणे, सोहम शेटिया उपस्थित होते.

ह.भ.प.(कै.) बलभीमअण्णा जगताप यांचा वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या जगताप कुटुंबियांतर्फे आ.अरूणकाका जगताप, आ.संग्रामभय्या जगताप तसेच जिल्हा परिषद सदस्य सचिनभाऊ जगताप व जगताप कुटुंबियांच्यावतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी पाच लाख रुपये निधी समर्पित केला. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख डॉ.मिलिंद मोभारकर यांनी विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सहप्रमुख दादा वेदक यांची व आमदार संग्राम जगताप यांची भेट घडवून आणली व अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पित करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला आ. जगताप यांनी प्रतिसाद दिला.

ते म्हणाले, आमच्या परिवाराला धार्मिक व अध्यात्मिक वारसा आमचे आजोबा ह.भ.प.(कै.)बलभीमअण्णा जगताप यांच्याकडून आलेला आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरीच्या पांडुरंगाचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी जवळजवळ ५० वर्षे पंढरपूरची वारी कधीही चुकू दिली नाही. त्यांचा धार्मिक व अध्यात्मिक वारसा पुढे आमचे वडील आमदार अरूणकाका जगताप यांनी सुरू ठेवला. त्यांच्या पुढाकारातून व समस्त बनपिंप्री (ता. श्रीगोंदे) ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी बनपिंप्री येथे श्री भैरवनाथाचे भव्य मंदिर उभारले आहे. आमचे मोठे बंधु सचिनभाऊ जगताप ( जिल्हा परिषद सदस्य ) हे देखील गेली अनेक वर्षे पंढरीच्या पायी दिंडीत जात आहेत. माझ्या व आदरणीय काकांच्या माध्यमातून नगर शहरात तसेच सारसनगर परिसरात स्थानिक भाविकांच्या मदतीने संत तुकाराम महाराज, संत सावता महाराज, संत भगवान बाबा, संत गाडगे महाराज, सद्गुरू सिदाजी आप्पा, जैन धर्मस्थानक, चर्च अशी अनेक मंदिरे व प्रार्थनास्थळे आम्ही उभारू शकलो, हे आमच्या परिवाराचे परमभाग्य आहे, असे आम्ही समजतो. संपूर्ण भारत देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या अयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पित करून एक छोटे योगदान देता आले व प्रभु श्रीरामांच्या चरणी सेवा अर्पण करता आली, हे आमच्या परिवाराचे अहोभाग्य आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post