राजकीय हेतूने केलेल्या आरोपांकडे मी दुर्लक्ष करतो : रोहित पवार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याबद्दल मांडलेले विचार विसरले गेले. परंतु केवळ राजकीय हेतूने एखाद्या वाक्याचा आधार घेऊन आरोप केले जात आहेत, अशा आरोपांकडे मी दुर्लक्ष करतो,' असे प्रतिपादन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी येथे व्यक्त केले.

जेजुरी कार्यक्रमातील शरद पवार यांच्या वक्तव्यावरून माजी पालक मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पवारांवर टीका केली होती, यावर आ. रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, 'ज्या वेळेस मी कर्जत-जामखेड मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवण्याचा विचारात होतो, त्यावेळी आजोबा शरद पवार यांनी मला बोलावून घेऊन त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांचे जन्मगाव जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आहे व त्या पवित्र जन्मभूमीची सेवा करण्याची संधी तुला मिळणार आहे, तेथील नागरिक तुला ती देणार आहेत. त्यामुळे अहिल्यादेवींच्या कार्याचा अभ्यास कर व त्यानुसार काम कर, असा सल्ला त्यांनी मला दिला होता. अहिल्यादेवींनी प्रशासन, पाणीपुरवठा व अध्यात्म या विषयात केलेल्या कार्याच्या अनुषंगाने मतदार संघात काम करण्याचा सल्लाही त्यांनी मला दिला होता व त्या सल्ल्यानुसार मी काम करीत आहे. परंतु जेजुरीच्या कार्यक्रमातील एका वाक्याच्या आधाराने राजकीय हेतूने कोणी काही टीका करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य आहे, असे मला वाटते,' असेही पवार म्हणाले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, 'एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे त्या मुलीला न्याय मिळेल, अशी मला आशा आहे. डागी मंत्र्यांना हाकलण्याबाबत काही विधाने होत आहेत. परंतु डाग हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर लागत असतो. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोण जबाबदार आहे, हे पोलीस तपासात स्पष्ट होईल व त्यानंतर कोणाच्या अंगावर डाग आहेत, हे समोर येईल, असे ते म्हणाले. राज्यात मागच्यावेळी भाजपचे सरकार असताना अनेक मंत्र्यांवर आरोप झाले होते. त्यांच्यावर डाग होते. परंतु त्यावरून भाजपने कोणाचेही राजीनामे घेतले नाही. त्यामुळे आता त्यांनी कोणाच्या राजीनाम्याच्या मागणीच्या गोष्टी करणे योग्य नाही,' असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post