'त्या' शतकाचा होणार आनंदोत्सव.. चक्क लाडू वाटप करणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारत व इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने व दुसऱ्या डावात आर. अश्विन यांनी शानदार शतके झळकावल्याने भारतीय क्रिकेट प्रेमी त्यांच्या या शतकाचा आनंदोत्सव करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, आणखी एका अनोख्या शतकाचा आनंदोत्सव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणीकर येत्या दोन दिवसात करणार आहेत व तेही चक्क लाडू वाटप करून व हे शतक असणार आहे ते पेट्रोलच्या दरवाढीचे. ९५-९६ रुपये लिटर झालेले पेट्रोलचे दर लवकरच १०० रुपये लिटर होण्याची चिन्हे असल्याने पेट्रोल दरवाढीचे हे अनोखे शतक आनंदोत्सवाने साजरे करण्याचे उपरोधिक आंदोलन पारनेरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नियोजित केले आहे. त्याची सध्या जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. पेट्रोल दरवाढीविरोधात व भाजप सरकार विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उप-जिल्हाध्यक्ष मारुती रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भाळवणी येथे श्रीनागेश्वर मंदिर देवस्थान ते भाळवणी बस स्टॉप तसेच बाजार परिसरात लाडू वाटप व फटाके वाजवून पेट्रोल व डिझेल यांचा दर शंभरी पूर्ण झाल्यामुळे शतकपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना आंदोलकांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि त्यात सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे. पेट्रोलने नव्वदी कधीच पार केली असून आता ९४ रुपयांच्या पुढे पेट्रोलचे दर गेले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात अनेक आंदोलने चालू आहेत. पारनेर तालुक्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोल दरवाढीचा वेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात येणार असून गुरुवारी भाळवणी येथे नागेश्वर मंदिरापासून आंदोलन सुरू होणार आहे. पेट्रोल लवकर शंभरीत जाणार असल्याने त्याच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने लाडू वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठेवण्यात आला असल्याची माहिती रोहोकले यांनी दिली. तालुक्यात महाराष्ट्र निवडणूक निर्माण सेना वेगवेगळ्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असते. वीज वाढीव वीज बिलाच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जामंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी तहसील आणि पोलीस खात्याला पत्र दिले होते. आता पेट्रोल दरवाढीविरोधात एका वेगळ्या पद्धतीने निषेधाचे शिकार मोदी सरकार होणार आहे. पेट्रोलच्या शंभरीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना केंद्राचा निषेध करणार असून पेट्रोल लवकर १०० वर जाणार असल्याने भाळवणी गावामध्ये सर्वांना लाडू वाटप करण्यात येणार आहे व पेट्रोल-डिझेल वाढल्याची जाणीव करून देण्यात येणार आहे, अशी माहिती रोहोकले यांनी दिली आहे.

या लाडुवाटपाच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, नितीन म्हस्के,पप्पू शेठ लामखडे, अशपाक हवलदार, वसीम राजे, अविनाश पवार, सतीश म्हस्के, महेंद्र गाडगे, प्रकाश राजदेव, जालिंदर बांडे, अजय दावभट, अक्षय सूर्यवंशी, बाळासाहेब माने उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post