अहमदनगरच्या 'या' स्पर्धेत वारणानगर व पुण्याचे वर्चस्व


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या कॉ. एकनाथराव भागवत वादविवाद स्पर्धेत वारणानगर व पुण्याच्या स्पर्धकांनी वर्चस्व मिळवले. नगरच्या असलेल्या य़ा स्पर्धेत नगरच्या विद्यार्थ्यांना अवघी दोन बक्षिसे जिंकता आली.

कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या स्मृतिनिमित्त नगरच्या न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा झाली. यात यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय (वारणानगर) या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघाने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.

वादविवाद स्पर्धेत प्रणाली पाटील आणि गणेश लोळगे यांच्या संघाने प्रथम क्रमांक तर गोविंद अंभोरे आणि आशिष साडेगावकर (वृत्तपत्र आणि जनसंवाद विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. ऋषभ चौधरी आणि अनिकेत डमाळे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत दीपक कसबे आणि चैतन्य बनकर या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. तर रेवन्नाथ भोसले आणि महेश उशीर (सदगुरु गगनगिरी महाराज महाविद्यालय, कोपरगाव) या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. सामाजिक व राजकीय विषयावरील सर्वोत्कृष्ट वक्त्याचा करंडक चैतन्य बनकर या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने मिळवला. तर स्त्री विषयासाठीचा करंडक रेसिडेन्शियल ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा गंगावणे हिने मिळवला. प्रज्वल नरवडे, साईनाथ महादवाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. पारितोषिक वितरण कॉम्रेड कारभारी उगले व जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या हस्ते झाले. तरुणांनी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, संघर्षाशिवाय काही मिळणार नाही असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले.

या स्पर्धेसाठी राहुल विद्या माने (पुणे) व ज्ञानेश्वर जाधवर (पुणे) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी बोलताना माने यांनी, स्पर्धकांना आपली अभिव्यक्ती लोकशाही मूल्यांसाठी वापरण्याचे आवाहन केले. तर जाधवर यांनी स्पर्धकांनी इतरांच्या प्रभावातून बाहेर पडून स्वतःच्या बोलण्यात आणि विचारांमध्ये प्रगल्भता आणावी, अशी सूचना केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. बी. बी सागडे यांनी केले. यावेळी निर्मलाताई काटे, सीतारामजी खिलारी, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंधरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. के. मोटे उपस्थित होते. डॉ. ज्ञानदेव कोल्हे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post