'जरे हत्याकांडाचा तपास 'त्यांच्या'कडे गेल्यास, ते आपले अपयश ठरेल'

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'यदाकदाचित रेखा जरे हत्याकांडाचा तपास सीआयडी कडे वर्ग झाल्यास, ते आपले (नगर पोलिस) अपयश राहील....'', अशा शब्दात येथील ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश लगड यांनी जिल्हा पोलिसांना वास्तवाची जाणीव करून दिली आहे. 'त्या फरार बहाद्दराला (पत्रकार बाळ ज. बोठे) अटक करा व जनतेला आनंदाची बातमी द्या,' असे आवाहनही अॅड. लगड यांनी पोलिसांना केले आहे.

अॅड. सुरेश लगड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार (मास्टरमाईंड ) डॉ.बाळ ज.बोठे याचे नाव या गुन्हयात निष्पन्न झाल्यापासून हा बहाद्दर फरार आहे. रेखा जरे हत्याकांडातील इतर पाच आरोपी आपल्या पोलीस दलाने अल्पकालावधी जेरबंद केले. मात्र, गुन्हा घडुन जवळपास अडीच महिने झाले तरी हा सहावा फरार आरोपी मास्टरमाईंड बाळ ज. बोठे आपल्या कार्यक्षम अशा पोलीस दलाला सापडत नाही, ही अतिशय धक्कादायक व गंभीर बाब आहे, अशी खंतही यात व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, चार्जशीट दाखल करण्याची वेळ संपत आली तरी देखील हा फरार आरोपी पोलिसांना सापडत कसा नाही, ही संशोधनाची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिसांबद्दल आम जनतेमध्ये एक वेगळी प्रतिमा तयार होत आहे. तेव्हा काहीही करा, पण या फरार बहाद्दरास कुठल्याही परिस्थितीत अटक करा. आपल्या अधिपत्याखालील पोलीस दलाने अनेक सराईत व फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या असताना डॉक्टर व वकिलीची डिग्री संपादन करणारा हा मास्टरमाईंड बहाद्दर आपणास शोध घेवून सापडत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. या फरार आरोपीचा ठावठिकाणा मिळण्यासाठी या आरोपीकडून त्याचे घरी होणारे फोन कॉलची सविस्तर माहिती घ्यावी व काहीही करून या आरोपीस अटक करून जनतेला आनंदाची बातमी द्या. आपल्या अधिपत्याखालील पोलीस दलास अनेक गुन्हयातील आरोपी सापडत आहेत व आम्ही नगरकर अजूनही आशावादी आहोत की आपण कायद्याचा पदवीधर असलेल्या या फरार आरोपीस लवकर जेरबंद कराल, असे नमूद करून यात पुढे म्हटले आहे की, या गंभीर गुन्हयाच्या तपासाचा अधिक वेग वाढवावा व कुठल्याही परिस्थितीत या फरार डॉक्टरेट पदवी असलेल्या आरोपीचा तात्काळ शोध घेवून त्याला गुन्हयाच्या कामी मदत करणारे मित्रांसह विनाविलंब अटक करावी. या आरोपीस अटक न झाल्याने आम जनतेत आपल्या अधिपत्याखालील कार्यक्षम अशा पोलीस दलाबद्दल चुकीचा संदेश जात आहे. या फरार आरोपीकडून अटकपूर्व जामीन मिळणेकामी सर्वोच्च न्यायालय (नवी दिल्ली) येथे प्रयत्न केला जाईल. त्यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन कसा फेटाळला जाईल, यासाठी आपण स्वतः जातीने सर्वोच्च न्यायालयात हजर राहून सरकारी वकिलांना माहिती देवून प्रयत्न करावेत, अशी माझी विनंती आहे. यदाकदाचित आपला हा तपास सीआयडी कडे वर्ग झाल्यास ते आपले अपयश राहील असे वाटते. तरी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार (मास्टरमाईंड ) डॉ.बाळ ज.बोठे याचा शोध घेवून त्यास विनाविलंब अटक करावी, असे अॅड. लगड यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post